इचखेड्यात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात; ३ वर्षांच्या आरुषी तडवीचे रील्स स्पर्धेत विशेष यश
पारंपरिक वेशभूषा, लोकगीते आणि संस्कृतीचा जागर; तारासिंग बाबा फाउंडेशनतर्फे आयोजित स्पर्धेत चिमुकलीचा गौरव
इचखेडा, ता. यावल | प्रतिनिधी : हर्षल पाटील : यावल तालुक्यातील इचखेडा येथे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, लोककला आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश देत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमानिमित्त आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला. पारंपरिक गीते, लोकसंस्कृती आणि निसर्गाशी असलेले आदिवासी समाजाचे नाते यांचा जागर करण्यात आला. जल, जंगल आणि जमीन संवर्धनासोबतच आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
तारासिंग बाबा फाउंडेशनतर्फे रील्स स्पर्धा
आदिवासी संस्कृती व परंपरेचा प्रचार-प्रसार नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने तारासिंग बाबा फाउंडेशन, इचखेडा यांच्या वतीने ऑनलाइन ‘व्हिडिओ रील्स स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला परिसरातील नागरिक तसेच बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेत अवघ्या ३ वर्षांच्या आरुषी शेखर तडवी हिने पारंपरिक आदिवासी पोशाख परिधान करून संस्कृती व परंपरेवर आधारित व्हिडिओ रील सादर केली. तिच्या आकर्षक सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उत्कृष्ट सहभागाबद्दल आरुषी हिला फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
मान्यवरांसह ग्रामस्थांची उपस्थिती
कार्यक्रमास तारासिंग बाबा फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. शेखर एस. तडवी आणि सचिव सिमरन शेखर तडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सायबु नामदार तडवी, लुकमान नामदार तडवी, सरदार रमजान तडवी, फिरोज इस्माईल तडवी, अयुब रहेमान तडवी, युसुफ कालू तडवी, सोहेल फिरोज, परवेज लुकमान, मोहम्मद अरब, महमूद सुभान यांच्यासह सोयंके परिवार ग्रुपचे सदस्य आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक उपक्रम आणि चिमुकल्या आरुषीच्या यशामुळे इचखेड्यातील जागतिक आदिवासी दिवसाचा सोहळा विशेष ठरला.
