Spread the love

ममुराबाद येथे वीजतारेच्या स्पर्शाने बैलाचा जागीच मृत्यू; महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी संकटात

बांधावर तुटून पडलेल्या जिवंत उच्चदाब तारेला बैलाचा स्पर्श; दोन-तीन शेतमजूरही विजेच्या धक्क्याने बचावले, नुकसानभरपाईची मागणी

ममुराबाद (विशेष प्रतिनिधी) : शेतात कोळपणीचे काम सुरू असताना बांधावर तुटून पडलेल्या जिवंत उच्चदाब विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने एका बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (९ ऑगस्ट) सकाळी ममुराबाद परिसरात घडली. या घटनेत जवळील दोन-तीन शेतमजुरांनाही विजेचा जोरदार धक्का बसला; मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

ममुराबाद येथील शेतकरी शरद पुंडलिक नारखेडे (वय ४५) यांच्या शेतात सकाळी कोळपणीचे काम सुरू होते. याचदरम्यान शेताच्या बांधावर तुटून पडलेल्या उच्चदाब विद्युत तारेला बैलाचा नकळत स्पर्श झाला. तारेला वीजप्रवाह सुरू असल्याने बैलाला जोरदार विजेचा धक्का बसला आणि काही क्षणांतच त्याचा जागीच मृत्यू झाला.

बैलाला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना तसेच जवळ काम करणाऱ्या दोन-तीन शेतमजुरांनाही विजेचा झटका बसला. सुदैवाने त्यांना गंभीर इजा झाली नाही.

नवीन खरेदी केलेल्या बैलाचा मृत्यू

विशेष म्हणजे शेतकरी शरद नारखेडे यांनी काही दिवसांपूर्वीच मोठ्या कष्टाने नवीन बैलजोडी खरेदी केली होती. ऐन शेती हंगामात शेतीकामाचा प्रमुख आधार असलेल्या एका बैलाचा मृत्यू झाल्याने नारखेडे कुटुंबावर मोठा आर्थिक आघात झाला आहे.

महावितरणच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप

तार तुटून शेताच्या बांधावर पडलेली असतानाही तिच्यात वीजप्रवाह सुरू कसा राहिला? वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्यानंतर आपत्कालीन यंत्रणेद्वारे वीजपुरवठा तातडीने का खंडित झाला नाही? असे प्रश्न आता ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत. या घटनेला महावितरणच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

नुकसानभरपाईसह विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीची मागणी

घटनेची निष्पक्ष चौकशी करून शेतकरी शरद नारखेडे यांना महावितरणकडून तातडीने योग्य ती नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच ममुराबाद परिसरातील जुन्या, जीर्ण आणि धोकादायक विद्युत वाहिन्यांची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version