चोपड्यात जागतिक आदिवासी दिनाचा जल्लोष; आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह हजारो आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
विविध बँड पथकांचा गजर, पारंपरिक नृत्य अन् महापुरुषांना अभिवादन; सोनवणे कुटुंबीयांनीही धरला आदिवासी नृत्यावर ठेका
चोपडा | प्रतिनिधी – राहुल पाटील : चोपडा तालुक्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या पुढाकाराने चोपडा शहरात जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरातून विविध पारंपरिक व आधुनिक बँड पथकांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत चोपडा तालुक्यातील हजारो आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला.
सोनवणे कुटुंबीयांनी धरला आदिवासी नृत्यावर ठेका
मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण म्हणजे आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे आणि जळगाव महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. अमृताताई सोनवणे यांनी आदिवासी बांधवांसोबत मिरवणुकीत सहभागी होत पारंपरिक आदिवासी नृत्यावर ठेका धरला. लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्तपणे आदिवासी बांधवांच्या आनंदात सहभाग घेतल्याने कार्यकर्ते आणि उपस्थितांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला.
महापुरुषांना अभिवादन
मिरवणुकीला चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती येथून सुरुवात झाली. महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मेन रोड, आझाद चौक आणि पाटील दरवाजा मार्गे मिरवणूक पुन्हा महाराज चौक व बसस्थानकावरून कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पोहोचली.
महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लताताई सोनवणे, नगरसेविका डॉ. अमृताताई सोनवणे आणि मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
हजारो आदिवासी बांधवांचा सहभाग
चोपडा तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातून हजारो आदिवासी बांधव तसेच शिवसैनिक मिरवणुकीत सहभागी झाले. विविध बँड पथकांच्या तालावर आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला. पारंपरिक वेशभूषा, नृत्य आणि वाद्यांच्या गजरामुळे शहरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.
चहा, पाणी आणि महाप्रसादाची व्यवस्था
कार्यक्रमासाठी आलेल्या आदिवासी बांधव तसेच नागरिकांसाठी आयोजकांच्या वतीने चहा, पाणी आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. उत्स्फूर्त सहभाग, नियोजन आणि एकजुटीमुळे चोपडा तालुक्यातील जागतिक आदिवासी दिनाचा सोहळा जल्लोषात पार पडला.
