Spread the love

बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ होणार?

आ. श्वेताताई महाले यांच्या मागणीला मुख्यमंत्री फडणवीसांची सकारात्मक दाद; नामांतराच्या हालचालींना वेग

जळगाव प्रतिनिधी : ऐतिहासिक आणि पवित्र वारसा लाभलेल्या बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांनी केली आहे. यासंदर्भातील अधिकृत निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले असून, मुख्यमंत्र्यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत पुढील कार्यवाहीसाठी सामान्य प्रशासन विभागाला निर्देश दिल्याची माहिती आहे.

राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीचा सन्मान

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ही राजमाता जिजाऊसाहेबांची जन्मभूमी आहे. त्यामुळे या जिल्ह्याला ‘राजमाता जिजाऊनगर’ असे नाव देणे म्हणजे त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचा आणि जन्मभूमीचा सन्मान ठरेल, अशी भूमिका आ. महाले यांनी मांडली आहे.

राजमाता जिजाऊ यांनी बाल शिवबांच्या मनात स्वराज्याची संकल्पना रुजवली. त्यांच्या संस्कारातून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष घडला. त्यामुळे जिजाऊंच्या नावाने जिल्ह्याची ओळख निर्माण झाल्यास त्यांच्या कार्याचा गौरव अधिक व्यापक स्तरावर होईल, असा दावा करण्यात आला आहे.

पर्यटनाला मिळणार नवी ओळख

बुलढाणा जिल्ह्याला धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटनाचा समृद्ध वारसा लाभला आहे. लोणार सरोवर, शेगावचे श्री गजानन महाराज मंदिर, मेहकरचे शारंगधर बालाजी मंदिर, ज्ञानगंगा अभयारण्य आणि सैलानी बाबा दर्गा यांसारखी विविध पर्यटनस्थळे जिल्ह्यात आहेत.

‘राजमाता जिजाऊनगर’ असे नामकरण झाल्यास जिल्ह्याची स्वतंत्र ऐतिहासिक ओळख देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. त्यातून जिल्ह्यातील पर्यटनाला आणखी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘अहिल्यानगर’च्या धर्तीवर नामकरणाची मागणी

अहिल्यानगरच्या धर्तीवर बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्यात यावे, अशी मागणी आ. श्वेताताई महाले यांनी केली आहे. या नामांतरामुळे शिवप्रेमी, जिजाऊप्रेमी तसेच जिल्ह्यातील नागरिकांच्या भावनांचा योग्य सन्मान होईल, अशी भूमिका त्यांनी निवेदनातून मांडली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक दखल

आ. महाले यांच्या प्रस्तावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, सामान्य प्रशासन विभागाला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या नामांतराच्या मागणीला आता प्रशासकीय पातळीवर पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मात्र, अंतिम नामांतरासाठी शासनाची अधिकृत प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असून, त्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ‘बुलढाणा’चे ‘राजमाता जिजाऊनगर’ असे नामकरण प्रत्यक्षात कधी होणार, याकडे आता जिल्हावासीयांसह शिवप्रेमी आणि जिजाऊप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version