रावेर येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात मोर्चा
तहसीलदार दीपा जेधे यांना निवेदन; अनंत बदर समितीचा अहवाल रद्द करण्याची मागणी
रावेर (प्रतिनिधी) :
अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात रावेर येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मोर्चा कृती समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार दीपा जेधे यांना देण्यात आले.
मोर्चाची सुरुवात येथील छोरिया मार्केट येथून झाली. मोर्चात सहभागी समाजबांधवांनी हातात निळे ध्वज, विविध मागण्यांचे फलक घेत आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन
मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचल्यानंतर नगरसेवक नरेंद्र वाघ, नगरसेविका अनिता तायडे आदींच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयाकडे रवाना झाला.
तहसील कार्यालयाजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी निळे निशाण संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर, कामगार नेते दिलीप कांबळे, ॲड. योगेश गजरे, उमेश गाढे, मनोहर तायडे, ॲड. दीपक तायडे, आत्माराम तायडे यांनी मनोगत व्यक्त केले. निवेदनाचे वाचन संघरत्न दामोदरे यांनी केले.
यानंतर कृती समितीच्या शिष्टमंडळाने तहसीलदार दीपा जेधे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे आणि पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले.
अनंत बदर समितीचा अहवाल रद्द करण्याची मागणी
मोर्चाच्या माध्यमातून एकल सदस्यीय अनंत बदर समितीचा अहवाल तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच हा अहवाल महाराष्ट्रातील नागरिकांसमोर सार्वजनिक करण्यात यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
समितीच्या अहवालावर मोठ्या प्रमाणात आक्षेप व सूचना प्राप्त झाल्याचा दावा करत, त्यावर विविध स्तरांवर सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सुनावणीदरम्यान अनुसूचित जातीतील प्रत्येक जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी समितीवर नियुक्त करावेत आणि त्यांच्या मतांच्या आधारे अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
मोर्चात समाजबांधवांचा मोठा सहभाग
मोर्चात आनंद बाविस्कर, दिलीप कांबळे, उमेश गाढे, प्रदीप सपकाळे, ॲड. योगेश गजरे, संघरक्षक तायडे, दिलीप साबळे, नगरसेवक नरेंद्र वाघ, नगरसेविका अनिता तायडे, प्रशांत गाढे, धुमा तायडे, निलेश नन्नवरे, बाळू शिरतुरे, आत्माराम तायडे, मनोहर तायडे, सावन मेढे, महेश तायडे, विजय भोसले, ॲड. दीपक तायडे, विजय अवसरमल, विनोद मोरे, महेंद्र कोचुरे, राजेंद्र अटकाळे, साहेबराव वानखेडे, रवी तायडे, ॲड. आनंद वाघोदे, संघरत्न दामोदरे, सदाशिव निकम, रवींद्र रायपुरे, राहुल गाढे, चांगो भालेराव यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप सपकाळे यांनी केले.
