Spread the love

‘एक पेड माँ के नाम 3.0’ अंतर्गत बोदवड येथे वृक्षारोपण

सर सत्यजित राम नेमाडे विद्यालयात वन महोत्सव; विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले

बोदवड, दि. १० (प्रतिनिधी) :
राष्ट्रीय शिक्षण संस्था, बोदवड संचलित सर सत्यजित राम नेमाडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सामाजिक वनीकरण विभाग, परीक्षेत्र जळगाव आणि बोदवड नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम 3.0’ अभियानांतर्गत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.

कार्यक्रमास सामाजिक वनीकरण विभाग, परीक्षेत्र जळगावचे आरएफओ सौरव पाटील प्रमुख आयोजक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंतराव कुलकर्णी होते. बोदवड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष लव्हंगडे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पीएसआय स्वाती एडके, बोदवड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश पुदाके, माजी नगराध्यक्ष सईद बागवान, न. ह. रांका हायस्कूलचे एनसीसी प्रमुख सावळे सर, तंबाखूमुक्त अभियानाचे तालुका समन्वयक तथा रेणुका माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक मराठे सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. जी. हजारी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय बदल

मार्गदर्शन करताना आरएफओ सौरव पाटील यांनी सध्याच्या काळात निसर्गात होत असलेले बदल, तापमानातील वाढते चढ-उतार आणि अवकाळी पावसाचे वाढते प्रमाण यामागे मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन व संवर्धन करणेही तितकेच आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून आपल्या परिसरात अधिकाधिक झाडे लावावीत, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमर सुनगत यांनी केले. वन महोत्सव यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version