Spread the love

नाशिक कुंभमेळ्याच्या नावावर ५०० कोटींचा बनावट टेंडर घोटाळा?; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट

पोलिसांना जेवण, पाणी, बॅरिकेड्स, हाऊसकीपिंगच्या नावाने बनावट वर्क ऑर्डर; जामनेर-धुळे कनेक्शनचा संशय

नाशिक | प्रतिनिधी :

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या नावावर बनावट ऑफलाइन निविदा आणि वर्क ऑर्डर तयार करून तब्बल ५०० कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचा गौप्यस्फोट कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. या कथित प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील दोन आणि धुळे जिल्ह्यातील एका व्यक्तीचा सहभाग असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

कुंभमेळ्यासाठी शासनाने स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केले असून, त्यामध्ये पाच आयएएस अधिकारी कार्यरत आहेत. कुंभमेळ्याशी संबंधित निविदा प्रक्रिया अधिकृतपणे ऑनलाइन पद्धतीने होत असताना काही व्यक्तींनी प्रशासनाच्या नावाचा गैरवापर करून बनावट ऑफलाइन वर्क ऑर्डर तयार केल्याचा आरोप आहे.

१०० ते १५० कोटींच्या वर्क ऑर्डर्सचा संशय
या कथित रॅकेटमधून तीन ते चार कंत्राटदारांना पोलिसांना दोन वेळचे जेवण पुरविणे, विविध साहित्य उपलब्ध करून देणे आदी कामांसाठी १०० ते १५० कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर्स देण्यात आल्याचे समोर आले आहे. संबंधित कंत्राटदारांना या ऑर्डर्स संशयास्पद वाटल्यानंतर त्यांनी स्वतःहून प्रशासनाकडे तक्रार केल्याचे सांगण्यात आले.

या बनावट वर्क ऑर्डर्स मिळवून देण्याच्या बदल्यात संबंधितांकडून रोख रक्कम तसेच धनादेशाच्या माध्यमातून पैसे घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर?
या प्रकाराची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, अशा कोणत्याही कामाची अधिकृत वर्क ऑर्डर किंवा कमिशनची मागणी करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाल्याचे महाजन यांनी सांगितले.

त्यामुळे शासनाच्या अधिकृत यंत्रणेचा आभास निर्माण करून कंत्राटदारांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

या कामांच्या नावाने बनावट ऑर्डर्स
पोलिसांना ७० दिवस दोन वेळचे जेवण पुरविणे

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणे

पोलिसांना बॅरिकेड्स पुरविणे

पोलिसांना हाऊसकीपिंग सेवा देणे

कुंभमेळ्याच्या नावावर एवढ्या मोठ्या रकमेच्या बनावट वर्क ऑर्डर्स तयार झाल्याची बाब समोर आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामागे नेमके कोण आहे, बनावट कागदपत्रे कुठे आणि कशी तयार करण्यात आली, तसेच आर्थिक व्यवहार कोणामार्फत झाले, याचा तपास झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

विशेष चौकट : नेमका घोटाळा काय?
५०० कोटी – कथित बनावट टेंडर/वर्क ऑर्डर्सची एकूण रक्कम
१००–१५० कोटी – तीन-चार कंत्राटदारांना देण्यात आल्याचे सांगितलेले वर्क ऑर्डर्स
३ व्यक्ती – जामनेरमधील दोन आणि धुळे जिल्ह्यातील एका व्यक्तीचा सहभाग असल्याची माहिती
ऑफलाइन ऑर्डर्स – अधिकृत प्रक्रिया ऑनलाइन असताना बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप
तपासाचा केंद्रबिंदू – बनावट कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर

Share.
Leave A Reply

Exit mobile version