Spread the love

विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द आणि ज्ञानाच्या बळावर भविष्य घडवावे – प्रा. डॉ. जतीन मेढे

‘गौरव यशवंतांचा’ उपक्रमात भुसावळ तालुक्यातील १५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

भुसावळ | प्रतिनिधी – संघरत्न सपकाळे :
शिक्षण हे मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणणारे प्रभावी साधन आहे. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द आणि ज्ञानाच्या बळावर स्वतःचे तसेच देशाचे उज्ज्वल भविष्य घडवावे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. जतीन मेढे यांनी केले.

प्रागतिक विचार मंचच्या वतीने आयोजित ‘गौरव यशवंतांचा’ या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. भुसावळ तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रत्येक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा गौरव समारंभ क्रांतीदिनी भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमास वरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे, पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरेप्रा. डॉ. सुनील नेवेडॉ. राजेश मानवतकर, प्रागतिक विचार मंचचे अध्यक्ष जे. पी. सपकाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

दीडशे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळ शहर व तालुक्यातील सुमारे १५० गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. मेढे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय शैक्षणिक प्रवासाचा दाखला दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. अनेक अपमान आणि अडचणींना सामोरे जात त्यांनी ज्ञान संपादन केले आणि आपल्या विद्वत्तेच्या बळावर जगभरात आदराचे स्थान निर्माण केले. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी देशातील नागरिकांना स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्वाची मूल्ये दिली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श समोर ठेवून शैक्षणिक प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

“राजे शिवराय, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समोर ठेवून कितीही कठीण परिस्थिती आली तरी शिक्षण सोडू नका. शिक्षणच जीवनात सर्वांगीण विकासाची दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे,” असेही प्रा. डॉ. मेढे यांनी सांगितले.

स्पर्धा परीक्षेच्या तयारीचे आवाहन

नगराध्यक्ष सुनील काळे यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश आत्मसात करून परिस्थितीशी लढण्याचे आवाहन केले.

पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी कठोर मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाशिवाय यश मिळत नसल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करून प्रशासनातील अधिकारी होण्याचे ध्येय ठेवावे, असे त्यांनी सांगितले.

प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परदेशातील शैक्षणिक प्रवासाच्या आठवणी सांगत विद्यार्थ्यांनी त्यांचे जीवनचरित्र वाचून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. “डॉ. आंबेडकर हे आपणा सर्वांचे ऊर्जा आणि प्रेरणाकेंद्र आहेत,” असे त्यांनी नमूद केले.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. राज्य समुपदेशक दिलीप सुरवाडे यांनी अभ्यासातील एकाग्रता कशी साधावी, याबाबत मार्गदर्शन केले.

गुणवंतांचा विशेष सन्मान

लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून यश मिळविलेल्या अक्षय विजय बाऱ्हे यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच भुसावळ व वरणगाव नगरपालिकेत अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेवक लोकप्रतिनिधींचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे. पी. सपकाळे यांनी केले. सूत्रसंचालन समाधान जाधव, पप्पू वानखेडे व विनोद बाऱ्हे यांनी केले, तर आभार देवेंद्र तायडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघरत्न सपकाळे, मिलिंद तायडे, सागर तायडे, विशाल दांडगे, प्रा. प्रशांत नरवाडे आदींनी परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version