उमेद अभियानातील कथित भ्रष्टाचाराविरोधात बचत गटाच्या महिलांचे ‘बिऱ्हाड’ आंदोलन
तीन दिवसांपासून जेलरोडवर आंदोलन; कारवाई न झाल्यास १५ ऑगस्टला सामूहिक आत्मदहनाचा इशारा
धुळे | प्रतिनिधी :
उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांना वितरित करण्यात आलेल्या विविध मशीनच्या दर्जाबाबत आणि खरेदी प्रक्रियेत कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत बचत गटाच्या महिलांनी धुळे शहरातील जेलरोड परिसरात ‘बिऱ्हाड’ आंदोलन सुरू केले आहे. वितरित करण्यात आलेल्या बंद पडलेल्या मशीन आंदोलनस्थळी आणून महिलांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून महिला आंदोलनाला बसल्या असूनही प्रशासनातील एकही वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल संताप व्यक्त करत भारती माळी यांनी, “लाडक्या बहिणी केवळ नावालाच आहेत का?” असा सवाल उपस्थित केला.
मशीन बंद पडल्याने रोजगाराचा प्रश्न
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उमेद अभियानांतर्गत धुळे तालुक्यातील विविध महिला बचत गटांना वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन वितरित करण्यात आल्या. मात्र काही कालावधीनंतर या मशीन बंद पडल्याने महिलांच्या रोजगारावर परिणाम झाला असून, त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
निकृष्ट दर्जाच्या मशीन वितरित करून शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.
१५ ऑगस्टला सामूहिक आत्मदहनाचा इशारा
आंदोलनाची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी आणि कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. दोन दिवसांत कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल, भारती माळी, विमलबाई पाटील, रेखाबाई पाटील, निर्मला पाटील, सरला माळी, संगीता पाटील यांच्यासह महिला बचत गटांच्या सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.
