Spread the love

कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा मानवतेचा वारसा; पोलिश निर्वासितांना दिला होता आश्रय

वळीवडेतील ऐतिहासिक स्मृतींना उजाळा; भारत-पोलंड मैत्रीचे नाते अधिक दृढ

कोल्हापूर | विशेष वृत्त :
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मानवतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या कार्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. जर्मनी आणि सोव्हिएत युनियनने पोलंडवर आक्रमण केल्यानंतर हजारो पोलिश नागरिकांना निर्वासित व्हावे लागले होते. अशा संकटाच्या काळात कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने १९४२ ते १९४८ या कालावधीत सुमारे पाच हजार पोलिश निर्वासितांना वळीवडे येथे आश्रय दिला होता.

कोल्हापूरकरांनीही या निर्वासितांना सहकार्य केले. त्यामुळे पोलिश नागरिकांना सुरक्षित वातावरणात सन्मानाने नवजीवन उभारता आले. या ऐतिहासिक घटनेमुळे कोल्हापूर आणि पोलंड यांच्यातील भावनिक व मैत्रीपूर्ण संबंधांची पायाभरणी झाली.

पोलिश शिष्टमंडळाची वळीवडेला भेट

या ऐतिहासिक वारशाचे स्मरण करण्यासाठी पोलिश शिष्टमंडळाने वळीवडे येथील स्मारकाला भेट दिली. यावेळी प्रस्तावित ‘म्युझियम ऑफ ह्युमॅनिटी अँड पीस’ प्रकल्पाचीही पाहणी करण्यात आली.

वळीवडे येथे पोलिश नागरिकांना मिळालेला आश्रय हा केवळ इतिहासातील एक प्रसंग नसून, संकटाच्या काळात मानवतेला धर्म, देश आणि सीमा यांच्यापलीकडे नेणाऱ्या कोल्हापूरच्या संस्कृतीचे उदाहरण मानले जाते.

‘दुसरे घर’ मानले कोल्हापूरला

पोलंडमध्ये परतल्यानंतरही अनेक पोलिश नागरिकांनी कोल्हापूरला आपले ‘दुसरे घर’ मानले. त्यामुळे वळीवडेच्या या ऐतिहासिक वारशाला भारत-पोलंड संबंधांमध्ये विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या ऐतिहासिक स्मृती आणि मानवतेचा संदेश पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि पोलंड सरकारच्या संयुक्त विद्यमाने संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावित संग्रहालयाच्या माध्यमातून वळीवडेतील पोलिश निर्वासितांच्या इतिहासाला तसेच भारताने संकटकाळात दाखविलेल्या मानवतेला जागतिक स्तरावर अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version