Spread the love

१५ ऑगस्टला मुख्याधिकारी नेमक्या कोणत्या ध्वजस्तंभावर तिरंगा फडकवणार?

भडगाव नगरपरिषदेतील मूळ ध्वजस्तंभ हटविल्याने संभ्रम; ७५ फुटी ध्वजस्तंभाचा उद्देशही अनुत्तरित — प्रशासनाचे मौन कायम

१३ ऑगस्टपासून भावेश पाटील यांचे धरणे आंदोलन

भडगाव | प्रतिनिधी :
स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना भडगाव नगरपरिषदेत १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज नेमक्या कोणत्या ध्वजस्तंभावर फडकविला जाणार? हा प्रश्न चर्चेत आला आहे. नगरपरिषद कार्यालय परिसरातील मूळ राष्ट्रीय ध्वजस्तंभ हटविण्यात आल्याने या निर्णयामागील आदेश, प्रशासकीय मंजुरी आणि कारणांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

या प्रकरणी निवेदन देऊनही प्रशासनाकडून अद्याप स्पष्ट भूमिका अथवा लेखी उत्तर मिळाले नसल्याचा आरोप भावेश भगवान पाटील यांनी केला आहे.

मूळ ध्वजस्तंभ कुणाच्या आदेशाने हटविला?

नगरपरिषद कार्यालयातील मूळ राष्ट्रीय ध्वजस्तंभ कोणत्या आदेशाने हटविण्यात आला? तो हटविण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी घेण्यात आली होती का? संबंधित आदेश, ठराव अथवा प्रशासकीय कागदपत्रे कोणती, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भावेश भगवान पाटील यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदन देऊन मूळ ध्वजस्तंभ हटविण्याची सखोल चौकशी, संबंधित आदेश व कागदपत्रे सार्वजनिक करणे आणि मूळ ध्वजस्तंभ पूर्ववत उभारणे, अशी मागणी केली आहे. मात्र निवेदन देऊन १५ दिवस उलटूनही ठोस कार्यवाही किंवा लेखी उत्तर मिळाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

७५ फुटी ध्वजस्तंभ नेमका कुणासाठी?

भडगाव येथे उभारण्यात आलेल्या ७५ फूट उंच राष्ट्रीय ध्वजस्तंभामुळेही नवा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ३० जून २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी ७५ फूट उंच राष्ट्रीय ध्वज उभारण्याची तरतूद करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मात्र भडगावातील हा ध्वजस्तंभ तालुका मुख्यालयासाठी आहे की नगरपरिषद कार्यालयासाठी? तो कोणत्या विभागाच्या अखत्यारित आहे? त्यासाठी निधी कोणत्या योजनेतून उपलब्ध झाला? तसेच प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी कोणत्या आधारावर देण्यात आली? या प्रश्नांची उत्तरे अद्याप स्पष्ट झालेली नसल्याचा आरोप आहे.

१५ ऑगस्टला नेमके होणार काय?

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आता सर्वांचे लक्ष नगरपरिषद प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे. मुख्याधिकारी १५ ऑगस्ट रोजी नेमक्या कोणत्या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकवणार? मूळ ध्वजस्तंभ हटविल्यानंतर ७५ फुटी ध्वजस्तंभावर ध्वजारोहण होणार आहे का, की नगरपरिषद कार्यालयासाठी स्वतंत्र ध्वजस्तंभ उभारला जाणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याने संभ्रम कायम आहे.

राष्ट्रीय ध्वजाशी संबंधित बाब असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. मूळ ध्वजस्तंभ हटविण्याचा आदेश, ७५ फुटी ध्वजस्तंभाची प्रशासकीय पार्श्वभूमी आणि १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणाची अधिकृत व्यवस्था याबाबत पारदर्शकपणे माहिती जाहीर करावी, अशी मागणी पुढे आली आहे.

१३ ऑगस्टपासून धरणे आंदोलन

दरम्यान, निवेदन देऊनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप करत भावेश भगवान पाटील यांनी १३ ऑगस्ट २०२६ पासून नगरपरिषद कार्यालयासमोर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर १५ ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी नेमक्या कोणत्या ध्वजस्तंभावर तिरंगा फडकवतात, याकडे भडगावकरांचे लक्ष लागले आहे.

चौकट : प्रशासनासमोर चार प्रमुख प्रश्न

  • मूळ ध्वजस्तंभ हटविण्याचा आदेश कुठे आहे?

  • ७५ फुटी ध्वजस्तंभाची प्रशासकीय मंजुरी काय आहे?

  • या ध्वजस्तंभाचा ताबा नेमका कोणत्या विभागाकडे आहे?

  • १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण नेमके कुठे होणार?

या चार प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडून कधी मिळणार, हा सध्या भडगावमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version