Spread the love

अन्नात भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करा!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अन्न व औषध प्रशासन विभागाला निर्देश; दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश

पारोळा | सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) :

नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध, दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले आहेत. भेसळ करणाऱ्यांविरोधात संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करून मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

विकसित महाराष्ट्र २०४७’ अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी विभागनिहाय निश्चित करण्यात आलेले टप्पे आणि त्यांच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सादरीकरणावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेसळखोरांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे निर्देश दिले.

‘भेसळ हा नागरिकांच्या जीवाशी खेळ’

अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणे हा केवळ सामान्य स्वरूपाचा गुन्हा नसून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. विशेषतः लहान मुले मोठ्या प्रमाणावर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करतात. बनावट पनीर तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने अशा प्रकारांना आळा घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

भेसळखोरांकडून लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याने अशा समाजकंटकांवर कोणतीही नरमाई दाखवू नये. अशा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करून भेसळखोरांवर जरब बसवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

अन्न भेसळीविरोधात कठोर मोहीम अपेक्षित

दूध, दुग्धजन्य पदार्थ, बनावट पनीर आणि इतर अन्नपदार्थांमधील भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने अधिक प्रभावी तपासणी व कारवाई करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

बैठकीस सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, विधि व न्याय विभागाचे सचिव उदय शुक्ला, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्देशांमुळे अन्न भेसळ करणाऱ्यांविरोधात आगामी काळात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version