Spread the love

विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पोलिसांची व्हॅन ‘बेवारस’! प्रशासनाचे वाहनच रामभरोसे?

गेल्या ४–५ दिवसांपासून पोलिसांची शासकीय व्हॅन कार्यालयासमोर; दरवाजे-खिडक्या लॉक नसल्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : जॉन भालेराव

छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पोलिसांची शासकीय व्हॅन गेल्या ४–५ दिवसांपासून उभी असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांचे शासकीय वाहन खराब झाल्यानंतर ते दुरुस्तीसाठी न नेता तसेच उभे करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

विशेष म्हणजे या व्हॅनचे दरवाजे व खिडक्या लॉक नसल्याचे सांगण्यात येत असल्याने शासकीय वाहनाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या ताफ्यातील वाहनाचीच अशा प्रकारे सुरक्षा होत असेल, तर इतर शासकीय मालमत्तेच्या सुरक्षेबाबत काय परिस्थिती असेल, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

वाहनाची जबाबदारी कोणाची?

शासकीय वाहन खराब झाल्यानंतर त्याची दुरुस्ती, देखभाल आणि सुरक्षित पार्किंगची जबाबदारी संबंधित विभागाची असते. मात्र, वाहन अनेक दिवस कार्यालयासमोर उभे असून त्याचे दरवाजे-खिडक्या लॉक नसल्याचा प्रकार समोर आल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाहनात कोणालाही प्रवेश करता येण्याची शक्यता असल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या प्रकाराची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन वाहन सुरक्षित ठिकाणी हलवावे तसेच त्याच्या सुरक्षेबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

पोलिसांच्या वाहनाचीच सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र निर्माण झाले असून, प्रशासन याची दखल कधी घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version