Spread the love

‘शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगा आणि आयुष्यात मोठे व्हा’ — जलसंपदामंत्री गिरीष महाजन

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व प्रज्ञावंत फाउंडेशनच्या शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाचे कौतुक; ‘ज्ञानदीप’ अभियानाचा शुभारंभ

जळगाव | प्रतिनिधी

“आई-वडील आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट करतात. त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करावा, शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगावे आणि आयुष्यात मोठे यश संपादन करावे,” असा प्रेरणादायी संदेश जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन यांनी विद्यार्थ्यांना दिला.

आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई आणि प्रज्ञावंत फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने राबविण्यात आलेला शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम आणि ‘ज्ञानदीप’ अभियान कौतुकास्पद व समाजाला दिशा देणारे असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. जळगाव येथील नियोजन भवनात सोमवारी (दि. १० ऑगस्ट) आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप सोहळ्यात ते बोलत होते.

‘गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात देणे हे समाजाभिमुख कार्य’

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. “समाजातील गरजूंची नेमकी गरज ओळखून त्यांना मदतीचा हात देणे, हे खऱ्या अर्थाने समाजाभिमुख कार्य आहे. पत्रकार संघ आणि प्रज्ञावंत फाउंडेशन गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत आहेत, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे,” असे त्यांनी सांगितले.

शैक्षणिक साहित्याचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करून मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी घुगे यांनी केले.

‘ज्ञानदीप’ अभियानाचा शुभारंभ

प्रज्ञावंत फाउंडेशन, जळगावच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘ज्ञानदीप’ अभियानाच्या पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन हे अभियान वर्षभर राबविण्याचा संकल्प महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष तथा प्रज्ञावंत फाउंडेशनचे संचालक प्रवीण सपकाळे यांनी व्यक्त केला.

“शैक्षणिक साहित्याची मदत… प्रत्येक गरजू विद्यार्थ्याच्या जीवनात ‘ज्ञानाचा दीप’ प्रज्वलित करण्याचा संकल्प,” या उद्देशाने सुरू करण्यात आलेले ‘ज्ञानदीप’ अभियान विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार देण्यासोबतच समाजातील दातृत्वाची भावना अधिक बळकट करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

कार्यक्रमास जलसंपदामंत्री गिरीष महाजन, जिल्हाधिकारी रोहन घुगे, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवणे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज काळे, जिल्हा प्रदूषण अधिकारी करण राजपूत यांच्यासह श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय पाठक, ज्येष्ठ महिला संपादक शांता वाणी, संपादक मुकुंद नन्नावरे, करणी सेनेचे राज्य संघटक विलास पाटील, संघटनेचे विधी सल्लागार अॅड. दीपक सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पत्रकार पाल्य तसेच गरजू व गुणवंत अशा ३०० विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास बॉक्स आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भूषण महाजन यांनी केले. सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले.

दात्यांच्या सहकार्यामुळे उपक्रमाला बळ

या उपक्रमासाठी जैन उद्योग समूहाने विद्यार्थ्यांसाठी आवश्यक वह्या उपलब्ध करून दिल्या, तर रामलालजी मेमोरियल ट्रस्टचे विशेष सहकार्य लाभले. तसेच विविध दानशूर व्यक्ती व संस्थांनी दिलेल्या योगदानामुळे हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबविता आला.

यावेळी प्रवीण सपकाळे यांनी सहकार्य करणाऱ्या सर्व दाते, संस्था व हितचिंतकांचे आभार मानले. ‘ज्ञानदीप’ अभियानाच्या माध्यमातून वर्षभर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचविण्याचा संकल्प असून, समाजातील अधिकाधिक दात्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नगराज पाटील, भगवान मराठे, गोपाल सोनवणे, संतोष नवले, योगेश सैतवाल, नरेंद्र पाटील, प्रवीण पाटील, चंदू खरे, विक्रम कापडणे, सतीश सैंदाणे, अबरार मिर्झा, गणेश रावळ आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. शिक्षणाच्या वाटचालीत मिळालेली ही मदत निश्चितच प्रेरणादायी असल्याची भावना पालक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version