Spread the love

श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालयात “वाचनसंस्कृती आणि आजचा तरुण” विषयावर व्याख्यान

पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त आयोजन; विद्यार्थ्यांना वाचनाची सवय जोपासण्याचे आवाहन

रावेर | प्रतिनिधी : प्रदीप खैरे

येथील श्री व्ही. एस. नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आय.क्यू.ए.सी. (IQAC) आणि ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने “वाचनसंस्कृती आणि आजचा तरुण” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात भूगोल विभागप्रमुख प्रा. चतुर गाढे यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. पाटील होते.

‘माहिती’पेक्षा ‘ज्ञान’ महत्त्वाचे : प्रा. चतुर गाढे

मार्गदर्शन करताना प्रा. चतुर गाढे यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पारंपरिक वाचनसंस्कृतीसमोर आव्हाने निर्माण झाली असली, तरी व्यक्तिमत्त्व विकास, ज्ञानवृद्धी आणि चिकित्सक विचारक्षमता वाढविण्यासाठी वाचनाचे महत्त्व कायम आहे.

मोबाईलच्या एका क्लिकवर मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध होते; मात्र माहिती आणि ज्ञान यामध्ये फरक आहे. सखोल व तर्कशुद्ध विचार करण्यासाठी पुस्तकांचे सातत्यपूर्ण वाचन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुस्तके, वर्तमानपत्रे, चरित्रे आणि संदर्भग्रंथ यांच्या वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात तसेच भाषिक कौशल्य विकसित होते. त्याचबरोबर ई-बुक्स, डिजिटल ग्रंथालये आणि ऑडिओबुक्स यांसारख्या आधुनिक माध्यमांचा तरुणांनी विवेकपूर्ण वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाईलच्या पडद्यासोबत पुस्तकांच्या पानांनाही वेळ द्या : प्राचार्य डॉ. ए. जी. पाटील

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. ए. जी. पाटील यांनी सांगितले की, आजचा तरुण तंत्रज्ञानाचा कुशल वापरकर्ता आहे. मात्र, तंत्रज्ञानासोबत पुस्तकांशी मैत्री केली तर व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होईल.

“मोबाईलच्या पडद्यासोबत पुस्तकांच्या पानांनाही वेळ देणे ही काळाची गरज आहे. वाचनसंस्कृती जिवंत राहिली तरच विचारांची समृद्धी आणि समाजाची प्रगती होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथालय विभागप्रमुख डॉ. बी. जी. मुख्यदल यांनी केले, तर आभार प्रा. एल. एम. वळवी यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. एस. बी. धनले, प्रा. एस. डी. महाजन, प्रा. टी. एम. दसनूरकर, सुनील मेढे आणि जयेश बढे यांनी सहकार्य केले.

या व्याख्यानाला महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वाचनसंस्कृतीचे महत्त्व आणि डिजिटल युगातील वाचनाची गरज याविषयी मार्गदर्शन घेतले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version