Spread the love

मायक्रोफोनऐवजी पाण्याची बाटली अन् खड्ड्यांवर ‘ग्राऊंड रिपोर्टिंग’!

पेगलवाडीच्या चिमुकल्यांचा प्रशासनाला अनोखा आरसा; रस्त्यांच्या दुरवस्थेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

नाशिक | प्रतिनिधी

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असताना आता प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शाळकरी मुलांनीच अनोखी पत्रकारिता सुरू केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी-गोहिरेवाडी परिसरातील विद्यार्थ्यांनी पाण्याच्या रिकाम्या बाटलीला मायक्रोफोन बनवत रस्त्यांवरील खड्ड्यांचे ‘ग्राऊंड रिपोर्टिंग’ केले. या चिमुकल्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

‘रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता?’

पेगलवाडी परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शाळेत जाताना खराब रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासाची व्यथा विद्यार्थ्यांनी आपल्या अनोख्या ‘रिपोर्टिंग’मधून मांडली. रिकामी पाण्याची बाटली हातात घेऊन त्यांनी रस्त्यावरील खड्डे दाखवत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

चिमुकल्यांच्या ‘रिपोर्टिंग’ची सर्वत्र चर्चा

या विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यावसायिक साधनांशिवाय केलेल्या या ‘ग्राऊंड रिपोर्टिंग’मधून परिसरातील रस्त्यांची वास्तविक परिस्थिती समोर आणली आहे. सामाजिक जाणीव आणि सर्जनशीलतेतून विद्यार्थ्यांनी प्रशासनाला जणू आरसाच दाखवला आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांमध्येही संताप व्यक्त होत आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन पेगलवाडी-गोहिरेवाडी परिसरातील रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

चिमुकल्यांचा सवाल प्रशासनाला

दररोज शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाच जर खराब रस्त्यांमुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असेल, तर विकासाच्या दाव्यांचे काय? असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. चिमुकल्यांच्या या अनोख्या ‘ग्राऊंड रिपोर्टिंग’नंतर तरी प्रशासनाचा डोळा उघडणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version