Spread the love

पाचोरा शहरातील अवैध सट्टा-पत्ता व इतर धंदे बंद करण्याची मागणी; एकलव्य आदिवासी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

जारगाव चौफुली, नगरपालिका जिन, स्टेशन रोडसह विविध परिसरांचा निवेदनात उल्लेख; १५ ऑगस्टला ‘सट्टा-पत्ता खेलो आंदोलन’ करण्याचा इशारा

पाचोरा | प्रतिनिधी

पाचोरा शहरासह जारगाव चौफुली, नगरपालिका जिन, स्टेशन रोड, एम.एम. कॉलेज चौक, आठवडे बाजार परिसरात सुरू असल्याचा आरोप असलेले अवैध सट्टा-पत्ता व इतर अवैध धंदे तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी एकलव्य आदिवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर आत्माराम वाघ यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील विविध भागांत अवैध सट्टा-पत्ता व इतर धंदे खुलेआम सुरू असल्याचा आरोप असून, त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याने संबंधितांचे मनोबल वाढत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

कष्टकऱ्यांच्या पैशांचे नुकसान होत असल्याचा आरोप

सट्टा-पत्त्याच्या नादामुळे कष्टकरी, मजूर आणि सामान्य नागरिक दिवसभर मेहनत करून कमावलेला पैसा गमावत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवत असून, युवकांचे भविष्य धोक्यात येत असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.

अवैध धंद्यांमुळे समाजात गुन्हेगारीला खतपाणी मिळण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

१५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा

पाचोरा शहर व तालुक्यातील अवैध सट्टा-पत्ता तसेच इतर अवैध धंदे तात्काळ बंद न झाल्यास दि. १५ ऑगस्ट रोजी ‘सट्टा-पत्ता खेलो आंदोलन’ करण्यात येईल, असा इशारा एकलव्य आदिवासी संघटनेने दिला आहे.

या आंदोलनाच्या माध्यमातून अवैध धंद्यांविरोधातील जनआक्रोश व्यक्त करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

हे निवेदन एकलव्य आदिवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर आत्माराम वाघ आणि जळगाव जिल्हाध्यक्ष एकनाथ अहिरे यांच्या वतीने देण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version