जिल्हा परिषद शाळा बंद होऊ नयेत; पालकांनी शाळांना साथ द्यावी — बी. व्ही. गायकवाड
काहुरखेडे जिल्हा परिषद शाळेतील ६५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
भुसावळ | प्रतिनिधी :
जिल्हा परिषद शाळा या गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या असून, गावातील पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश देऊन या शाळा टिकविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सेवानिवृत्त अकाऊंट ऑफिसर बी. व्ही. गायकवाड यांनी केले.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून उपदेश फाउंडेशन, भुसावळ यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काहुरखेडे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. व्ही. गायकवाड होते. दीपनगर येथील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चंद्रकांत सपकाळे यांनी या शैक्षणिक साहित्याचे दातृत्व केले.
६५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
शाळेतील सर्व ६५ विद्यार्थ्यांना दुरेघी, चौकटी, चौरेघी मिक्स वह्या, ‘मी वाचणारच’ इंग्रजी उजळणी पुस्तक, ‘मूलभूत गणित व १ ते १०० संख्या वाचन-लेखन उपक्रम’ उजळणी पुस्तक, ‘१९ खडी मी वाचणारच’ उजळणी पुस्तक आदी शैक्षणिक साहित्य देण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत सपकाळे, सुरेंद्र रामटेके, यशराज हंबर्डीकर तसेच उपदेश फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
‘जिल्हा परिषद शाळा गुणवत्तापूर्ण’
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना बी. व्ही. गायकवाड म्हणाले, “जिल्हा परिषद शाळा गुणवत्तापूर्ण आहेत. या शाळांमधील शिक्षक उच्चशिक्षित असून डी.एड. व बी.एड. पदवीधारक आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश द्यावा आणि या शाळा बंद होऊ नयेत यासाठी पुढाकार घ्यावा.”
जिल्हा परिषद शाळा बंद झाल्यास गोरगरीब, शेतकरी आणि मजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होईल. अनेक पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले व्यक्ती जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन आज उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे या शाळांचे महत्त्व मोठे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“शैक्षणिक साहित्य वाटपामागे कोणताही स्वार्थ नसून गोरगरीब व गरजू पालकांच्या मुलांनी शिक्षण घ्यावे, शाळेत टिकावे आणि शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदांवर पोहोचावे, हाच या उपक्रमाचा उद्देश आहे,” असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास उपदेश फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक शिंदे, उपाध्यक्ष संदेश शिंदे, रेल्वे गार्ड आर. एस. वानखेडे, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी बी. एस. नरवाडे, रेल्वे तिकीट कंडक्टर सुरेंद्र रामटेके, एमएसईबी साकेगाव ऑपरेटर यशराज हंबर्डीकर, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी गौतम निकम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक समाधान जाधव यांनी केले. प्रास्ताविक संदेश शिंदे यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षिका ममता तडवी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, निलेश पाटील, गजानन पाटील, विनोद धनगर, वामन सपकाळे, आकाश पाटील, गोकुळ पाटील, धीरज पाटील तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
