Spread the love

परभणीत जैन गुरुकुलातील विद्यार्थ्यांना इंग्लिश डिक्शनरीचे वाटप

शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह; इंग्रजी भाषेच्या ज्ञानवृद्धीसाठी पुढाकार

परभणी | प्रतिनिधी | दि. १३ ऑगस्ट २०२६ :
परभणीजवळील नवागड (उखलद) येथील श्री. १००८ नेमिनाथ दिगंबर जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणारा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेचे ज्ञान अधिक समृद्ध व्हावे आणि शिक्षणाची गोडी वाढावी, या उद्देशाने डॉ. दिपक महिंद्रकर यांच्या वतीने गुरुकुलातील विद्यार्थ्यांना इंग्लिश डिक्शनरीचे (शब्दकोशाचे) वाटप करण्यात आले.

नवीन डिक्शनरी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि नव्या पुस्तकांविषयीची उत्सुकता या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दसंपत्ती वाढविण्यासाठी या शब्दकोशांचा निश्चितच उपयोग होणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या शैक्षणिक उपक्रमावेळी गुरुकुलचे व्यवस्थापक संदीप हेलसकर, अधीक्षक पार्श्वनाथ शिरसागर यांच्यासह गुरुकुलातील शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. दिपक महिंद्रकर यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल गुरुकुल व्यवस्थापन आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. अशा शैक्षणिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक साधने उपलब्ध होऊन त्यांच्या शैक्षणिक व बौद्धिक विकासाला चालना मिळते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version