१०० ते १५० शेतकऱ्यांसह १०० ते २०० हेक्टर शेती प्रभावित; शेती साहित्य वाहतुकीसह आपत्कालीन परिस्थितीतही अडचणींची भीती
पाचोरा | प्रतिनिधी
तालुक्यातील तारखेडा बु. येथील रेल्वे विभागाने बंद केलेला शेतरस्ता तातडीने पूर्ववत सुरू करावा, या मागणीसाठी ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन दिले.
ग्रामस्थांच्या निवेदनानुसार, गावापासून नामदेव झिपरू बागुल यांच्या शेतापर्यंत पूर्वीपासून वापरात असलेला शेतरस्ता रेल्वे विभागाने सुमारे दोन महिन्यांपूर्वी बंद केला आहे. रेल्वे पोल क्रमांक ३६५/१ ते ३६५/१५ दरम्यानचा हा मार्ग परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, दैनंदिन शेती कामांसाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता.
२०० हेक्टरपर्यंत शेतीवर परिणाम होण्याची शक्यता
शेतरस्ता बंद झाल्याने परिसरातील सुमारे १०० ते २०० हेक्टर शेती प्रभावित होण्याची शक्यता आहे. खते, बी-बियाणे, कीटकनाशके, औषधे तसेच शेतीची अवजारे शेतापर्यंत पोहोचविताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा शेती साहित्य डोक्यावरून किंवा पर्यायी मार्गाने वाहून न्यावे लागत असल्याने शेतीचा खर्च आणि श्रम दोन्ही वाढले आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत जीविताचा धोका
शेतात काम करताना सर्पदंश, अपघात किंवा अन्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेणे कठीण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी निवेदनातून व्यक्त केली आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ शेतीपुरता मर्यादित नसून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेशी आणि जीविताशी संबंधित असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
१५० शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून
या मार्गावर अवलंबून असलेले सुमारे १०० ते १५० शेतकरी शेतीच्या उत्पन्नावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतरस्ता कायमस्वरूपी बंद राहिल्यास शेती करणे आर्थिकदृष्ट्या कठीण होऊन शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढण्याची भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याची मागणी
या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करावी, प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करावी आणि बंद करण्यात आलेला शेतरस्ता पूर्ववत सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी आर. आर. पाटील, धनराज पाटील, शांताराम जाधव, बापू पहिलवान, पंकज पाटील, बापू पाटील, दिनेश मोरे, मधुकर पाटील, सुधाकर पाटील, सनी पाटील, रोहिदास पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतरस्ता बंद झाल्याने निर्माण झालेला प्रश्न आता ऐरणीवर आला असून, आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
