Spread the love

‘आमचे विद्यार्थी–आमचा अभिमान’; माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून शाळेच्या डिजिटल शिक्षणाला बळ

धरणगाव | प्रतिनिधी : वाल्मिक पाटील

धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सवी महात्मा फुले हायस्कूलला सन १९९९ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ५० इंची TCL स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला. ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या डिजिटल शिक्षणाला हातभार लावत हा उपक्रम राबविला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन होते. प्रमुख अतिथी म्हणून संचालक मोतीलाल महाजन, गोपाल महाजन, माजी मुख्याध्यापक एस. डब्ल्यू. पाटील, पत्रकार धर्मराज मोरे, ह. भ. प. हिरालाल महाराज, सिताराम महाजन, केदार मॅडम, शुभम महाजन यांच्यासह सन १९९९ बॅचचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.

‘आपली शाळा–सुंदर शाळा’ उपक्रमाला माजी विद्यार्थ्यांचा हातभार

सन १९९९ बॅचचे माजी विद्यार्थी दीपक वाघ, नरेंद्र बडगुजर आणि नितेश माळी यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतील आजी-माजी शिक्षकांचे कार्य आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. शाळेत विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जात असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘आपली शाळा–सुंदर शाळा’ या संकल्पनेअंतर्गत शाळेला डिजिटल शिक्षणाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी हा छोटासा प्रयत्न केल्याचे नरेंद्र बडगुजर यांनी सांगितले. भविष्यातही शाळेच्या गरजेनुसार मदत करण्यासाठी माजी विद्यार्थी सदैव तत्पर राहतील, अशी ग्वाही दीपक वाघ यांनी दिली.

स्मार्ट टीव्हीमुळे डिजिटल शिक्षणाला चालना

माजी विद्यार्थी नितेश माळी यांनी स्मार्ट टीव्ही संगणक कक्षात तातडीने इन्स्टॉल करून कार्यान्वित केला. यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिडिओ, डिजिटल अध्ययन साहित्य आणि विविध शैक्षणिक उपक्रमांचा प्रभावीपणे उपयोग करता येणार आहे.

मुख्याध्यापक जे. एस. पवार यांनी सन १९९९ बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करताना, विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने शिक्षण देण्यासाठी स्मार्ट टीव्ही अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.

‘आमचे विद्यार्थी–आमचा अभिमान’

कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी ‘आमचे विद्यार्थी–आमचा अभिमान’ या शब्दांत सन १९९९ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेने दिलेले संस्कार आणि शिक्षणाची जाणीव ठेवून माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी पुढाकार घेणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी रेखा पाटील, नितेश माळी, नरेंद्र बडगुजर, गुलाब महाजन, विजय महाजन, दीपक वाघ, सुजित वाघरे, विकास मोरावकर, बालू भोई, किशोर चौधरी, विनोद महाजन, विठ्ठल अहिरे, धनराज जाधव, किशोर पारधी, दिशा ढोबळे, रवींद्र पाटील यांच्यासह माजी विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी. पाटील यांनी केले, तर आभार एस. एन. कोळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version