Spread the love

येवती येथे ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

प्रभातफेरीसह देशभक्तीपर गीत, नृत्य व भाषणांनी रंगला सोहळा; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

बोदवड प्रतिनिधी  येवती, ता. बोदवड : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८०वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांसह गावातून भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.

विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने रंगला कार्यक्रम
शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून देशभक्तीपर गीते, नृत्य, भाषणे आणि विविध कलांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मनोजभाऊ माळी यांच्या शिफारशीनुसार, शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट निकाल मिळवून देणारे शिक्षक श्री. ईश्वर मंडावरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी श्री. योगेश घाटे सर व श्री. अकिल खान सर यांनी विद्यार्थ्यांसमोर शिस्तबद्ध कवायत सादर केली.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. श्री. नवलभाऊ वानखेडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना रजिस्टर व पेन देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी पालक व ग्रामस्थांनीही रोख रक्कम तसेच विविध बक्षिसे देऊन त्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच व उपसरपंच, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, पालक, मराठी व उर्दू माध्यमाचे शिक्षकवृंद तसेच अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. गजानन बावस्कर यांनी केले. सूत्रसंचालन श्री. ईश्वर मंडावरे व श्री. योगेश घाटे यांनी केले. कार्यक्रमाचे फोटोशूट श्री. नाजिम सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. योगेश घाटे सर यांनी मानले.

शेवटी विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे येवती जिल्हा परिषद शाळेचा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात आणि संस्मरणीय वातावरणात पार पडला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version