‘परिस्थिती भविष्य ठरवत नाही; जिद्द, चिकाटी आणि मेहनतच भविष्य घडवते’ — पालकमंत्री गुलाबराव पाटील
पाळधीत ७९२ निराधार व गरजू विद्यार्थ्यांना ‘मदतीचा हात’; GPS परिवाराचा शैक्षणिक आधार
पाळधी/जळगाव, दि. १७ | प्रतिनिधी :
“परिस्थिती माणसाचे भविष्य ठरवत नाही; जिद्द, चिकाटी आणि मेहनत परिस्थितीवर मात करून भविष्य घडवते. गरिबी ही शिक्षणाच्या वाटेतील अडचण असू शकते; मात्र ती विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची मर्यादा ठरू शकत नाही. विद्यार्थ्यांनी स्वतःला कधीही निराधार समजू नये. त्यांच्या शिक्षणाच्या वाटेवर माझ्यासह संपूर्ण GPS परिवार भक्कमपणे पाठीशी उभा आहे,” असा विश्वास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
पाळधी येथील सुगोकी रिसॉर्ट येथे GPS मित्र परिवाराच्या पुढाकारातून, मनोजभाऊ चौधरी मित्र परिवार आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्ट यांच्या सहकार्याने आयोजित ‘मदतीचा हात’ या उपक्रमात ते बोलत होते. यावेळी जळगाव व धरणगाव तालुक्यातील ७९२ निराधार व गरजू विद्यार्थ्यांना दप्तर, बूट-चप्पल, पाण्याची बाटली तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
‘७९२ विद्यार्थी नव्हे, उद्याची ७९२ स्वप्ने’
पालकमंत्री पाटील म्हणाले, “आमची नाळ सर्वसामान्यांशी जोडलेली आहे. गरिबीचे चटके आणि संघर्ष काय असतो, हे आयुष्य मी स्वतः जगलो आहे. आई-वडिलांची माया आणि त्यांचे स्थान जगात कोणीही घेऊ शकत नाही. मात्र परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबता कामा नये.”
“आज माझ्यासमोर ७९२ विद्यार्थी नव्हे, तर उद्याची ७९२ स्वप्ने आहेत. याच विद्यार्थ्यांमधून उद्याचे डॉक्टर, शिक्षक, अधिकारी, अभियंते, सैनिक, उद्योजक आणि कर्तृत्ववान नागरिक घडतील,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना परिस्थितीचा न्यूनगंड न बाळगता मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले.
अनाथ व एकल पालकांच्या मुलांसाठी चार कोटींचा प्रकल्प
जिल्ह्यात ६०० पेक्षा अधिक अनाथ आणि १० हजारांपेक्षा अधिक एकल पालकांची मुले असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
अनाथ प्रमाणपत्र व बालसंगोपन योजनेशी संबंधित प्रक्रिया डिजिटल करण्याचा प्रयत्न सुरू असून, एकल महिलांसाठी महिला उद्योजकता केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण, उद्योग उभारणी, उत्पादन, ब्रँडिंग आणि विक्रीसाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
निराधार बालकांना आधार, ज्येष्ठांना सन्मानाचे छत्र
समाजातील निराधार बालकांना सुरक्षित आधार मिळावा आणि निराधार ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याच्या उत्तरार्धात सन्मानाने जगता यावे, यासाठी अनाथाश्रम व वृद्धाश्रम उभारण्याचा मानस असल्याचेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
“आधाराची गरज असलेल्या बालकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना समाजाने एकटे पडू देता कामा नये,” अशी भावनिक भूमिका त्यांनी व्यक्त केली.
‘मदतीचा हात’ प्रसिद्धीसाठी नव्हे, सामाजिक बांधिलकीतून
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. GPS परिवाराचे विविध सामाजिक उपक्रम प्रसिद्धीसाठी नसून गरजू व उपेक्षित घटकांना संधी उपलब्ध करून देण्याच्या भावनेतून राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
“‘मदतीचा हात’ हा केवळ साहित्य वाटपाचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीला आधार देण्याचा संकल्प आहे,” असे प्रतापराव पाटील यांनी नमूद केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनीही विद्यार्थ्यांना परिस्थितीसमोर न खचता शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाण्याचे आवाहन केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा संघर्षमय जीवनप्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
८ हजार मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी विभागाच्या कामाची माहिती देताना आतापर्यंत सुमारे ८ हजार मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यात आल्याचे सांगितले. तसेच ६०० पेक्षा अधिक मुलांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले असून, भविष्यात ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील एकल महिलांसाठी उद्योजकता केंद्र स्थापन करण्यासाठीही पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
सहा वर्षांच्या ‘माऊली महाराजां’च्या गवळणीने रंगत
कार्यक्रमात चिंचपुरा येथील अवघ्या सहा वर्षांच्या ईयांश पाटील ऊर्फ ‘माऊली महाराज’ या बालकाने मधुर आवाजात गवळण सादर केली. त्याच्या आत्मविश्वासपूर्ण आणि सुरेल सादरीकरणाने उपस्थित मान्यवर व श्रोते मंत्रमुग्ध झाले. बालकाच्या कलागुणांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भूषण पाटील यांनी केले, तर आभार GPS संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी मानले.
यावेळी माजी उपमहापौर मनोज चौधरी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे, रोटरी क्लबचे सचिव धनराज कासट, पुनीत तलरेजा, मुकुंदराव नन्नवरे, शिवसेना तालुकाप्रमुख शिवराज पाटील, डी. ओ. पाटील, माजी सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, राजेंद्र चव्हाण, जनाआप्पा कोळी, सचिन पवार, शेतकरी संघाचे सभापती शरद पाटील, जितेंद्र पाटील, डॉ. कमलाकर पाटील, साहेबराव वराडे, रमेशआप्पा, मंगलअण्णा पाटील यांच्यासह पालक, विद्यार्थी, GPS परिवाराचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ७९२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार देत ‘मदतीचा हात’ उपक्रमाने शिक्षणाच्या वाटेवर संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात आशावाद आणि आत्मविश्वास निर्माण केला.
