सर जे. जे. रुग्णालयात पहिल्यांदाच सर्व्हायकल डिस्क रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वी
‘जे. जे.’च्या शिरपेचात मानाचा तुरा; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण यश, महागडी शस्त्रक्रिया विनामूल्य
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील भायखळा येथील ग्रँट सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे. जे. रुग्णालयात प्रथमच ‘सर्व्हायकल डिस्क रिप्लेसमेंट’ ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक मणक्याच्या शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
४० वर्षीय रुग्णाला मानेतील डिस्क हर्निएशनमुळे स्पायनल कॉर्डवर दाब येऊन सर्व्हायकल मायलोपॅथी झाली होती. यामुळे मानेत वेदना, हात-पायांमध्ये मुंग्या किंवा कमजोरी तसेच चालताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. अनेक दिवसांपासून रुग्ण या त्रासाने ग्रस्त होता. विविध ठिकाणी उपचार घेऊनही अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्याला जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
रुग्णाची तपासणी आणि आवश्यक वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर सर्व्हायकल डिस्क रिप्लेसमेंट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
मानेच्या मणक्यात कृत्रिम डिस्क बसवली
हिप किंवा गुडघ्याच्या सांध्यांचे रिप्लेसमेंट आता तुलनेने सर्वसामान्य झाले आहे. मात्र, मानेच्या मणक्यातील खराब झालेली डिस्क काढून तिच्या जागी कृत्रिम डिस्क बसविण्याची सर्व्हायकल डिस्क रिप्लेसमेंट ही तुलनेने अत्याधुनिक प्रक्रिया आहे. सर जे. जे. रुग्णालयात प्रथमच ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
या प्रक्रियेत खराब झालेली डिस्क काढून तिच्या जागी विशेष कृत्रिम डिस्क बसविण्यात येते. त्यामुळे स्पायनल कॉर्डवरील दाब कमी करण्यासोबतच मानेची नैसर्गिक हालचाल टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने केली शस्त्रक्रिया
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरसे आणि ऑर्थोपेडिक्स विभागप्रमुख डॉ. नादिर शाह यांच्या मार्गदर्शनाखाली स्पाईन सर्जन डॉ. कुशाल गोहिल यांनी ही शस्त्रक्रिया केली.
शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. उषा बाडोले आणि डॉ. प्रेरणा जोगदंड यांच्या नेतृत्वाखालील अॅनेस्थेशिया टीमने महत्त्वाची भूमिका बजावली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती उत्तम
शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती चांगली असून, वेदनांमध्ये लक्षणीय आराम मिळाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. उपचारानंतर रुग्णाच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत असून, रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी उपचाराबाबत समाधान व्यक्त केले.
लाखोंचा खर्च येणारी शस्त्रक्रिया विनामूल्य
सर्व्हायकल डिस्क रिप्लेसमेंटसाठी वापरण्यात येणारी कृत्रिम डिस्क महागडी असते. खासगी रुग्णालयात अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी काही लाख रुपयांचा खर्च येऊ शकतो. मात्र, सर जे. जे. रुग्णालयात ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही प्रगत उपचार उपलब्ध होण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
‘अत्याधुनिक स्पाईन सर्जरी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न’
स्पाईन सर्जन डॉ. कुशाल गोहिल यांनी सांगितले की, अत्याधुनिक स्पाईन सर्जरी केवळ मोठ्या खर्चाच्या खासगी रुग्णालयांपुरती मर्यादित न राहता सर्वसामान्य रुग्णांनाही उपलब्ध व्हावी, हा आमचा प्रयत्न आहे. जे. जे. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया विनामूल्य करता आली आणि रुग्णाला चांगला आराम मिळाला, हेच आमच्यासाठी मोठे समाधान असल्याचे त्यांनी नमूद केले.
सर जे. जे. रुग्णालयातील या यशामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत प्रगत स्पाईन सर्जरीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.
