Spread the love

वरखेड खुर्दमध्ये एक्वा फिल्टर प्लांट बंद; सचिन पाटील यांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशीही सुरू

ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप; आर्थिक हिशोबासाठी तातडीने ग्रामसभा घेण्याची मागणी

बोदवड | प्रतिनिधी | दि. १८ ऑगस्ट : बोदवड तालुक्यातील वरखेड खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेला एक्वा फिल्टर प्लांट गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने गावातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सचिन आधारसिंग पाटील यांनी सुरू केलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशीही सुरू असून, त्यांच्या आंदोलनाला ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.

वरखेड खुर्द येथील एक्वा फिल्टर प्लांटवर कॉइन बॉक्सची सुविधा असून, पाच रुपये टाकल्यानंतर पाणी मिळण्याची व्यवस्था आहे. मात्र, कॉइन बॉक्स बंद ठेवून नागरिकांकडून ऑफलाईन पद्धतीने दहा रुपये घेतले जात असल्याचा आरोप उपोषणकर्ते आणि ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून नागरिकांना निर्धारित दरातच पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

विस्तार अधिकाऱ्यांची उपोषणस्थळी भेट

उपोषण सुरू असताना विस्तार अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी पाणीप्रश्नासह ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत अधिकाऱ्यांसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली.

उपोषणाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामसेवकांनी रजेचा अर्ज केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावातील पाणीप्रश्न गंभीर असताना ग्रामसेवक अनुपस्थित असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

ग्रामनिधीच्या हिशोबावर ग्रामस्थांचे सवाल

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नागरिकांनी कराच्या माध्यमातून सुमारे सात लाख रुपयांपर्यंत ग्रामनिधी जमा करून दिला आहे. मात्र, गावात अपेक्षित विकासकामे झालेली नसताना ग्रामपंचायतीच्या खात्यात केवळ १५ हजार रुपये शिल्लक असल्याचे सांगितले जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण हिशोब ग्रामस्थांसमोर मांडण्यासाठी तातडीने ग्रामसभा घेण्यात यावी, अशी मागणी सचिन आधारसिंग पाटील यांनी केली आहे.

वृद्ध महिलेनेही अधिकाऱ्यांना विचारला जाब

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी विस्तार अधिकारी आंदोलनस्थळी आले असता एका वृद्ध महिलेने गावातील पाणीप्रश्नावरून अधिकाऱ्यांना जाब विचारला. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असताना प्रशासनाकडून ठोस उपाययोजना का करण्यात येत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा झाली नसल्याच्या प्रकाराचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावर विस्तार अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडून या विषयावर उत्तर घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन उपोषणकर्ते सचिन पाटील यांना दिले.

प्रकृती चिंताजनक; उपचार घेण्यास नकार

दरम्यान, आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी सचिन आधारसिंग पाटील यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत त्यांची शुगर ७० आणि रक्तदाब १५५ असल्याचे समोर आले. प्रकृतीची दखल घेत डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी बोदवड सिव्हिल रुग्णालयात जाण्यासाठी रेफर लेटर दिले आहे.

मात्र, मागण्या पूर्ण होईपर्यंत उपचार घेणार नाही, अशी भूमिका सचिन पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीसह आंदोलनाचा प्रश्नही प्रशासनासमोर गंभीर बनला आहे.

मागण्यांवर ग्रामस्थ ठाम

एक्वा फिल्टर प्लांट तातडीने सुरू करावा, नागरिकांना योग्य दरात पाणी उपलब्ध करून द्यावे, ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण हिशोब ग्रामसभेत सादर करावा आणि ग्रामसभेबाबत झालेल्या प्रकाराची चौकशी करावी, या प्रमुख मागण्यांवर उपोषणकर्ते आणि ग्रामस्थ ठाम आहेत.

दरम्यान, उपोषणस्थळी वरखेड खुर्द येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून सचिन पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. आता प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते आणि गावातील पाणीप्रश्नावर तोडगा कधी निघतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version