Spread the love

पाचोरा गिरणा पंपिंग रोडवर रस्ता खोदून चार दिवस उलटले; नागरिकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय

पाईपलाईनसाठी खोदलेला मुख्य रस्ता अद्याप जैसे थे; शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील यांचा प्रशासनाला इशारा

पाचोरा | किशोर रायसाकडा :
शहरातील गिरणा पंपिंग रोडवरील मुख्य रस्ता पाईपलाईन टाकण्यासाठी ठेकेदाराकडून गेल्या चार दिवसांपासून खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र, अद्याप खोदकाम पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आलेला नसल्याने नागरिकांसह शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

मुख्य रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आल्याने वाहनचालकांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांनाही या मार्गावरून जाताना त्रास सहन करावा लागत असून, खोदलेल्या रस्त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या ठिकाणी अपघाताची शक्यता अधिक असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

‘प्रशासन सुस्त, ठेकेदार मस्त’

रस्ता खोदून चार दिवस उलटूनही काम पूर्ण न झाल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘प्रशासन सुस्त, ठेकेदार मस्त’ अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत असून, संबंधित ठेकेदाराने कामाला गती देऊन रस्ता तातडीने पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे.

या प्रश्नाकडे लक्ष वेधताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील यांनी प्रशासनाने नागरिकांची गैरसोय गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी केली आहे. खोदकाम केलेल्या रस्त्यावर योग्य त्या सुरक्षाव्यवस्था कराव्यात तसेच पाईपलाईनचे काम तातडीने पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला सूचना द्याव्यात आणि खोदकाम केलेला रस्ता सुरक्षित करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांसह शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील यांनी केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version