Spread the love

७/१२ वरील कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी ८५ हजारांची लाच; पाचोऱ्यात स्टॅम्प वेंडर अटकेत

तलाठ्याने स्टॅम्प वेंडरमार्फत पैसे मागितल्याचा आरोप; ९० हजारांवरून तडजोडीनंतर ८५ हजारांची मागणी

पाचोरा | भुवनेश दुसाने :
शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारातील कालबाह्य नोंदी कमी करण्याच्या मोबदल्यात ८५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पाचोरा येथील खाजगी स्टॅम्प वेंडर समाधान सुभाष पाटील (रा. कुऱ्हाड खुर्द, ता. पाचोरा) याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्या कारवाईनंतर ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदाराच्या आजोबा ममराज हजारी पंजारी यांच्या नावावर कुऱ्हाड खुर्द येथे असलेल्या शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी तक्रारदाराने तलाठी नकुल काळकर यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. त्यावेळी तलाठ्याने ८० हजार रुपयांची मागणी करून पुढील कामासाठी स्टॅम्प वेंडर समाधान पाटील यांना भेटून पैसे देण्यास सांगितल्याचा आरोप आहे.

पंचासमक्ष पडताळणीत ९० हजारांची मागणी

या प्रकरणी तक्रारदाराने ७ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत समाधान पाटील याने सुरुवातीला ९० हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर ८५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली.

दरम्यान, तक्रारदाराच्या काकांनी आरोपी व तलाठ्याविरुद्ध तक्रार केल्याची माहिती आरोपीला मिळाल्यानंतर त्याने तक्रारदाराच्या घरी जाऊन पैसे देण्याची गरज नसल्याचे सांगितले. त्यामुळे नियोजित सापळा कारवाई होऊ शकली नसल्याचे समोर आले.

स्टॅम्प वेंडरला अटक; तहसील परिसरात खळबळ

या प्रकरणी २० ऑगस्ट रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर समाधान पाटील याला सायंकाळी अटक करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे पाचोरा तहसील कार्यालय परिसरात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. उपअधीक्षक सचिन सान्दखे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे पुढील तपास करीत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version