खवड्या डोंगरावर दरीत अडकलेल्या व्यक्तीला वाचविताना आई-वडिलांचाही मृत्यू
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला वाचविताना आई-वडीलही दरीत कोसळले; अग्निशमन पथकाचे आव्हानात्मक बचावकार्य
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : जॉन भालेराव
सोलापूर–धुळे महामार्गावरील तिसगावच्या पुढे असलेल्या खवड्या डोंगर परिसरात शुक्रवारी (२१ ऑगस्ट) सकाळी हृदयद्रावक घटना घडली. दरीत अडकलेल्या एका व्यक्तीला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचे आई-वडीलही दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आई-वडीलही दरीत कोसळले
प्राथमिक माहितीनुसार, खवड्या डोंगरावरील दरीत एक व्यक्ती अडकली असल्याची तसेच तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. माहिती मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीचे आई-वडील त्याला वाचविण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र, बचावाच्या प्रयत्नादरम्यान दोघेही दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.
या दुर्घटनेत तिघांचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, मृतांची ओळख अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नाही.
अग्निशमन पथकाचे घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच सकाळी ११ वाजून ३३ मिनिटांनी पदमपुरा अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. डोंगराळ परिसर आणि खोल दरी असल्याने बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक होते. अग्निशमन जवानांनी परिस्थितीचा आढावा घेत काळजीपूर्वक बचावकार्य सुरू केले.
मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशमन केंद्र अधिकारी विनायक कदम व संजय कुलकर्णी, ड्युटी अधिकारी संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन जवान महेंद्र खोतकर, संकेत निकाळजे, जगदीश गायकवाड, विजय कोथिंबीर व शिवसंभा कल्याणकर यांनी बचावकार्यात सहभाग घेतला.
वाहनचालक सय्यद सईद व दीपक वाटठे यांनी अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचविण्यासह बचाव पथकाला आवश्यक सहकार्य केले.
मृतांची ओळख व घटनेचे कारण तपासानंतर स्पष्ट होणार
घटनेतील तिन्ही मृतांची नावे अद्याप समोर आलेली नसून, त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. घटनेचे नेमके कारण तसेच संबंधित व्यक्ती दरीत कशा परिस्थितीत अडकली, याबाबतचा संपूर्ण तपशील पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
खवड्या डोंगर परिसरातील दरी खोल आणि दुर्गम असल्याने अग्निशमन जवानांसमोर बचावकार्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. जवानांनी उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने घटनास्थळी आवश्यक ती कार्यवाही केली.
या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, अधिकृत तपासातून घटनेचा संपूर्ण तपशील समोर येण्याची प्रतीक्षा आहे.
