Spread the love

बावी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला भक्तिमय प्रारंभ

२८ ऑगस्टला काल्याच्या कीर्तनाने सांगता; दररोज नामांकित कीर्तनकारांची सेवा

अहिल्यानगर जिल्हा | प्रतिनिधी – बापुसाहेब घोडेस्वार

जामखेड तालुक्यातील मौजे बावी येथे अध्यात्मिक परंपरेचा वारसा जपत भव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. ह.भ.प. बलभीम महाराज बावीकर यांच्या कृपाशीर्वादाने तसेच ह.भ.प. अंकुश महाराज पवार यांच्या आशीर्वादाने आयोजित करण्यात आलेला हा धार्मिक सोहळा २१ ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी रंगणार आहे.

व्यासपीठ चालक ह.भ.प. हनुमंत निकम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकडा भजन, दुपारी गाथा भजन, ‘राम कृष्ण हरी’ नामजप, सायंकाळी हरिपाठ तसेच रात्री नामवंत महाराजांची कीर्तन सेवा असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

नामवंत कीर्तनकारांची लाभणार सेवा

सप्ताहादरम्यान महाराष्ट्रातील विविध भागांतील नामांकित कीर्तनकार आपल्या रसाळ वाणीतून भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये ह.भ.प. बाबासाहेब महाराज दळवी (भाळवणीकर, ता. पारनेर), ह.भ.प. भाग्यवान महाराज रोडगे (बावची, भूम), ह.भ.प. विकास महाराज वायसे (लोणी), ह.भ.प. प्रदीप महाराज जाधव (कविटगाव, करमाळा), ह.भ.प. परमेश्वर महाराज खोसे (गिरवली, जामखेड), ह.भ.प. धर्मराज दादा सामनगावकर (बार्शी) आणि ह.भ.प. शरद महाराज लेकुरवाळे (आष्टी) यांची कीर्तन सेवा होणार आहे.

२८ ऑगस्टला काल्याच्या कीर्तनाने सांगता

सप्ताहाची सांगता शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी ह.भ.प. गोरक्षनाथ झांबरे (संगमेश्वर संस्थान) यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. कीर्तनानंतर भाविकांसाठी सामुदायिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सप्ताहाच्या कालावधीत दररोज कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या धार्मिक सोहळ्याचा परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सिद्धनाथ तरुण मंडळ, बावी यांच्या वतीने करण्यात आले आहे. सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील विविध भजनी मंडळे, तरुण मंडळे, ग्रामस्थ व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version