Spread the love

‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’ पुस्तकाचे प्रकाशन

साहित्यिक मिथुन ढिवरे यांच्या पुस्तकाचे भंडारा येथील साहित्यिका अस्मिता मेश्राम ‘पुष्पांजली’ यांच्या हस्ते प्रकाशन

जळगाव प्रतिनिधी जगदिश सपकाळे

जळगाव येथील साहित्यिक मिथुन ढिवरे लिखित ‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’ या पुस्तकाचे रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात प्रकाशन करण्यात आले. भंडारा येथील सुप्रसिद्ध साहित्यिका अस्मिता मेश्राम ‘पुष्पांजली’ यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला.

मिथुन ढिवरे यांच्या ‘जनमाणसांतील तुकोबा भाग एक’ या पुस्तकाचा पहिला भाग मागील वर्षी प्रकाशित झाला होता. त्यानंतर आता त्याच साहित्यिक वाटचालीचा पुढील टप्पा म्हणून ‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’ वाचकांच्या भेटीला आला आहे.

संत साहित्य सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न

पुस्तक प्रकाशनप्रसंगी बोलताना साहित्यिका अस्मिता मेश्राम ‘पुष्पांजली’ यांनी साहित्य म्हणजे काय, साहित्यनिर्मिती कशी होते आणि लेखकाने समाजाशी असलेले नाते कशा पद्धतीने साहित्याच्या माध्यमातून व्यक्त करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

साहित्यिक मिथुन ढिवरे यांनी आपल्या मनोगतात ‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’ हे पुस्तक लिहिण्यामागील प्रेरणा आणि त्याच्या लेखनाची प्रक्रिया स्पष्ट केली. संत परंपरेतून मिळालेली प्रेरणा या पुस्तकाच्या निर्मितीमागे असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राला समृद्ध संत परंपरेचा वारसा लाभला असून संतांचे अभंग आणि साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. मात्र हे संतवाङ्मय सर्वसामान्यांपर्यंत अधिक सहजपणे पोहोचावे, या उद्देशाने संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे सोप्या भाषेत निरूपणपर स्पष्टीकरण या पुस्तकातून करण्यात आल्याचे ढिवरे यांनी सांगितले.

पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेमीवंत धांडे सर होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’ या पुस्तकाचे महत्त्व तसेच साहित्यिक मिथुन ढिवरे यांच्या साहित्यिक योगदानावर भाष्य केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अथर्व प्रकाशनचे युवराज माळी उपस्थित होते. याशिवाय शहर व जिल्ह्यातील साहित्यिक, वाचक, साहित्यप्रेमी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून लेखकाला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शांताराम तायडे यांनी केले.

वाचकांना पुस्तकाची सप्रेम भेट

कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थित वाचकप्रेमी आणि साहित्यप्रेमींना चहा, नाश्ता तसेच प्रकाशित झालेले ‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’ हे पुस्तक सप्रेम भेट देण्यात आले. पुस्तक प्रकाशन सोहळ्यामुळे उपस्थित साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version