Spread the love

पिंपरी-चिंचवड : पीएमपीएमएल बस व्यवस्थापन अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून नामनिर्देशित सदस्यांची तात्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ) ही सेवा पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त व्यवस्थापनातून चालवली जाते. पूर्वी पीसीएमटी व पीएमटी या स्वतंत्र बससेवा अस्तित्वात होत्या. मात्र, आर्थिक अडचणींमुळे या दोन्ही सेवांचे एकत्रीकरण करून पीएमपीएमएलची स्थापना करण्यात आली.

मात्र, गेल्या आठ वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. अलीकडेच निवडणुका पार पडून दोन महिने उलटून गेले असले तरी अद्याप पीएमपीएमएलमध्ये नवीन नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. यामुळे बस व्यवस्थापनाच्या निर्णयप्रक्रियेत विलंब होत असून कारभारावर परिणाम होत असल्याचे काळभोर यांनी नमूद केले आहे.

दोन्ही महानगरपालिकांकडून प्रतिनिधी नियुक्त झाल्यास बस व्यवस्थापनात पारदर्शकता वाढेल, तसेच स्थानिक पातळीवरील समस्या अधिक प्रभावीपणे मांडता येतील. प्रवाशांना चांगल्या दर्जाची सेवा देण्यासाठी तसेच नियोजनबद्ध पद्धतीने बस सेवा चालवण्यासाठी या नियुक्त्या अत्यंत गरजेच्या असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.

याशिवाय, पुणे शहर, ग्रामीण भाग आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना दर्जेदार व वेळेवर बस सेवा मिळावी, यासाठी पीएमपीएमएलच्या कारभाराला गती देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लवकरात लवकर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करून पीएमपीएमएलचे व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यात यावे, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे स्थानिक पातळीवर पीएमपीएमएलच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version