Spread the love

बोरगावात ‘एक गाव, एक कानुबाई’ उत्साहात; भक्तिमय वातावरणात विसर्जन मिरवणुकीने उत्सवाची सांगता

तीन दिवस चाललेल्या उत्सवात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; ढोल-ताशांच्या गजरात कानुबाई मातेचा जयघोष

धरणगाव | प्रतिनिधी : वाल्मिक पाटील

बोरगाव खुर्द : खान्देशातील श्रद्धेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कानुबाई मातेचा ‘एक गाव, एक कानुबाई’ उत्सव धरणगाव तालुक्यातील बोरगाव खुर्द येथे यंदाही पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. रेशन दुकानदार धनराज प्रभाकर पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय उत्सवात ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला.

रोटपूजनाने उत्सवाची सुरुवात

उत्सवाच्या प्रारंभी शनिवारी पारंपरिक पद्धतीने रोटपूजन करण्यात आले. त्यानंतर रविवारी सकाळी विधिवत पूजा-अर्चा करून कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली. सायंकाळी मातेची आरती व पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.

कानुबाई मातेच्या दर्शनासाठी परिसरातील महिला, पुरुष तसेच युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक

सोमवारी सकाळी कानुबाई मातेची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि कानुबाई मातेच्या जयघोषाने मिरवणुकीचा उत्साह द्विगुणित झाला होता. ग्रामस्थांसह युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भक्तिमय वातावरणात मातेचा जयजयकार केला.

कानुबाई मातेचा विजय असो’ अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीदरम्यान भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पारंपरिक पद्धतीने उत्सवाचा आनंद घेतला.

‘एक गाव, एक कानुबाई’च्या माध्यमातून परंपरेचे जतन

खान्देशात नागपंचमीपूर्वी येणाऱ्या रविवारी कानुबाई मातेचा उत्सव साजरा करण्याची पारंपरिक प्रथा आहे. या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करत बोरगाव ग्रामस्थांनी ‘एक गाव, एक कानुबाई’ या संकल्पनेतून उत्सवाचे आयोजन केले.

विसर्जन मिरवणूक नदीकाठी पोहोचल्यानंतर विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर कानुबाई मातेचे विसर्जन करून तीन दिवस चाललेल्या उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली.

उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी बोरगाव खुर्द येथील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version