‘नारा-ए-तकबीर, अल्लाहू अकबर’च्या घोषणांनी धुळे दुमदुमले; मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक
हजारो मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग; पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन
धुळे | प्रतिनिधी :
मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने बुधवारी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. ‘नारा-ए-तकबीर, अल्लाहू अकबर’ अशा घोषणांनी शहरातील प्रमुख मार्ग दुमदुमून गेले. या मिरवणुकीत लहान बालकांपासून तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हजारो मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
एसपी विशाल आनंद यांच्या हस्ते मिरवणुकीला सुरुवात
शहरातील मच्छी बाजार चौकातून जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनातील अधिकारी तसेच मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते.
मच्छी बाजार चौकातून सुरू झालेली मिरवणूक गल्ली क्रमांक सहा, मौलवी गंज, राजकमल टॉकीज, आग्रा रोड, फुलवाला चौक, गांधी पुतळा मार्गे पांजरा नदीकिनारी असलेल्या अंजन शहा दाता सरकार दर्ग्याजवळ पोहोचली. तेथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
घोषणांनी आणि उत्साहाने परिसर दुमदुमला
शहरातील विविध भागांतून मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. हातात झेंडे घेतलेल्या तरुणांचा उत्साह, डीजेच्या तालावर सहभागी झालेली तरुणाई आणि धार्मिक घोषणांमुळे आग्रा रोड परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिरवणुकीत बालकांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. पारंपरिक उत्साहात आणि धार्मिक वातावरणात मोहम्मद पैगंबर जयंती साजरी करण्यात आली.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने प्रमुख मार्गांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधिकारी व कर्मचारी मिरवणुकीदरम्यान परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी फारुख चिस्ती लक्कड, मोहसीन खाटीक, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, अनिस खाटीक, गुलाम कुरेशी, जोयब खाटीक, मुजफ्फर खाटीक, अब्दुल्ला खाटीक, आकीब खाटीक, शोएब खाटीक, शवाल अन्सारी, अमीन पटेल, मुख्तार मन्सूरी यांच्यासह मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त आयोजित या मिरवणुकीतून धार्मिक उत्साहासोबतच सामाजिक एकोपा, शांतता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.
