साळी समाजातर्फे भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात
तरसोद येथे वृक्षारोपण व फलकाचे अनावरण; गुणवंत विद्यार्थी, पदोन्नतीधारक व समाजासाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव
जळगाव | प्रतिनिधी : साळी समाजाचे आद्यदैवत भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव साळी समाजाच्या वतीने भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी सहा वाजता भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी रामदास डहाके यांनी पोथी वाचन केले, तर साळी माता महिला मंडळाच्या वतीने स्वागतगीत सादर करण्यात आले.
याप्रसंगी भगवान श्री जिव्हेश्वर युवक मंडळाने तरसोद येथे नव्याने घेतलेल्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. तसेच जागेवरील फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, लॅन्ड डेव्हलपर यशवंत बारी, एरंडोल साळी महासभेचे अध्यक्ष सोमनाथ कासटकर, महावितरण जळगाव शहर व ग्रामीणचे अभियंता दत्तात्रय साळी, भगवान श्री जिव्हेश्वर युवक मंडळाचे अध्यक्ष राजू खेडकर, उपाध्यक्ष सुधीर खंडारे, सचिव किशोर खंडारे, सहसचिव पद्माकर आखडकर, कोषाध्यक्ष गणेश भोगरे यांच्यासह सुभाष धमके, संजय चिंचकर, प्रदीप साळी तसेच समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा, पदोन्नती प्राप्त समाजबांधवांचा तसेच समाजाच्या विविध उपक्रमांसाठी आर्थिक योगदान देणाऱ्या समाजबांधवांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली खंडारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहा खंडारे, दिनेश साळी, दत्तात्रय भोगरे, मनीष वाझट, प्रशांत खंडारे, प्रमोद भोगरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
