Spread the love

प्रजा सुराज्य पक्षाची निर्णायक बैठक आज; १७ सप्टेंबरच्या शिव-भीम पदयात्रेच्या आंदोलनाची दिशा ठरणार

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रश्नांसह ३४२ बेघर नागरिकांच्या घरांच्या मागणीसाठी आंदोलनाची तयारी; अध्यक्ष शरद गोटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

प्रतिनिधी | सोयगाव | शिवराम जाधव

सोयगाव : शालेय पोषण आहार कामगारांच्या विविध प्रश्नांसह प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्वांसाठी घरे (AHP घटक) योजनेअंतर्गत घरापासून वंचित असलेल्या बेघर नागरिकांच्या प्रश्नावर प्रजा सुराज्य पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रश्नांकडे सोयगाव नगरपंचायतीचे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप करत पक्षाने १७ सप्टेंबर २०२६ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ‘शिव-भीम पदयात्रा’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

या आंदोलनाची पुढील दिशा, नियोजन आणि उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव येथे निर्णायक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पक्षाच्या सोयगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोयगाव नगरपंचायत हद्दीतील ३४२ बेघर नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी प्रजा सुराज्य पक्ष गेल्या आठ वर्षांपासून संघर्ष करत असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, या मागणीची स्थानिक प्रशासनाने अपेक्षित दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. AHP घटक योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी ठोस कार्यवाही करण्याची मागणी पक्षाने केली आहे.

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रश्नांकडेही प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन त्यांच्या मागण्या मार्गी लावाव्यात, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे. दोन्ही प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आगामी शिव-भीम पदयात्रा आंदोलन निर्णायक ठरणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

अध्यक्ष शरद गोटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

दरम्यान, २६ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषद शाळा, सोयगाव येथे प्रजा सुराज्य पक्षाचे अध्यक्ष शरद गोटे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी, नागरिकांचे प्रश्न आणि आंदोलनाचे नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली.

आगामी बैठकीस सोयगाव तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी, सदस्य आणि संबंधित कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहून आपली भूमिका मांडावी, असे आवाहन अध्यक्ष शरद गोटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version