Spread the love

शहादा तालुक्यात ‘शेतकरी मित्र’ पदासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज मागणी  १४ जागा महिलांसाठी

शहादा प्रतिनिधी (संजय मोहिते) :

शहादा तालुक्यातील ४८ सहाय्यक कृषी अधिकारी सजा कार्यक्षेत्रांसाठी ‘शेतकरी मित्र’ पदाची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन वर्षांच्या कालावधीसाठी दरमहा १ हजार ५०० रुपये मानधनावर ही निवड होणार असून,इच्छुक उमेदवारांना ३१ ऑगस्टपर्यंत संबंधित ग्राम विकास समितीकडे अर्ज करता येणार आहे.

या ४८ पदांपैकी ३० टक्के म्हणजेच १४ सजा क्षेत्रे महिलांसाठी राखीव करण्यात आली आहेत. सोमवारी शहादा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये,मोहिदे त.श.,डामरखेडा, धुरखेडा,पाडळदा,मलगाव, डोंगरगाव,कवळीथ,दामळदा,ससदे, बिलाडी त.सा.,वडाळी,म्हसावद, रामपुर व बहिरपुर या गावांचा समावेश आहे. या सजा क्षेत्रांसाठी पुरुष उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

‘शेतकरी मित्र’ म्हणून गावात महिला व पुरुष शेतकरी गट तयार करणे, नैसर्गिक शेतीचा प्रचार करणे, ग्रामसभेत कृषी विभागाच्या योजनांची माहिती देणे तसेच तालुकास्तरीय प्रशिक्षणास उपस्थित राहणे ही प्रमुख कामे असतील. अधिक शिक्षण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य: उमेदवारासाठी वयोमर्यादा २५ ते ६० वर्षे आहे. तो सजा क्षेत्रातील रहिवासी व सक्रिय शेतकरी असणे आवश्यक आहे.किमान बारावी उत्तीर्ण असावो.अधिक शिक्षण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून,मोबाईल ॲप व सोशल मीडियाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.उमेदवारावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा. अर्जाचा विहित नमुना व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुरेश बागुल यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version