संयुक्त अरब अमिराती : सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्र साजरी करण्याची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. चंद्रकोर न दिसल्यामुळे यंदा शुक्रवार, 20 मार्च रोजी ईद-उल-फित्र साजरी केली जाणार आहे.
चंद्रदर्शन समितीच्या निरीक्षणानुसार बुधवारी संध्याकाळी शव्वाल महिन्याची चंद्रकोर दिसली नाही. त्यामुळे गुरुवार, 19 मार्च हा रमजानचा 30 वा आणि अंतिम दिवस ठरला असून त्यानंतर दुसऱ्या दिवशी ईद साजरी होणार आहे. इस्लामिक परंपरेनुसार, चंद्रकोर दिसणे हे रमजान समाप्तीचे आणि ईदच्या प्रारंभाचे महत्त्वाचे चिन्ह मानले जाते.
सौदी अरेबियामध्येही न्यायालये आणि वेधशाळांनी दिलेल्या अहवालानुसार चंद्रकोर न दिसल्याची पुष्टी करण्यात आली. त्यामुळे 20 मार्च हा ईदचा पहिला दिवस असल्याचे सौदी प्रशासनाने जाहीर केले. कुवेतच्या शरिया व्हिजन अथॉरिटीने तसेच कतार आणि बहरीननेही याच तारखेला ईद साजरी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
दरम्यान, यूएईमध्ये ईदच्या निमित्ताने सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सुट्ट्यांची घोषणा करण्यात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रासाठी 19 ते 22 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली असून 23 मार्चपासून कामकाज सुरू होणार आहे. खाजगी क्षेत्रासाठी 19 ते 21 मार्चपर्यंत सुट्टी असून रमजान 30 दिवसांचा झाल्यास ती 22 मार्चपर्यंत वाढवली जाणार आहे.
ईद-उल-फित्र हा इस्लाम धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण असून, रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर कुटुंबीय आणि समाज एकत्र येऊन मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. त्यामुळे आखाती देशांमध्ये सध्या ईदच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
