Spread the love

खानकाह-ए-चिश्तिया निजामियामध्ये मोए मुबारकचे दर्शन; भाविकांची मोठी गर्दी

ईद-ए-मिलाद-उन-नबीनिमित्त रूहानी कार्यक्रम; महिलांसाठी स्वतंत्र पडदा व दर्शनाची व्यवस्था

मलकापूर | प्रतिनिधी :
ईद-ए-मिलाद-उन-नबी अर्थात १२ रबी-उल-अव्वल या पवित्र पर्वानिमित्त मलकापूर येथील खानकाह-ए-चिश्तिया निजामिया येथे पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा ﷺ यांच्या पवित्र मोए मुबारकचे दर्शन आयोजित करण्यात आले. श्रद्धा, भक्ती आणि आदराच्या वातावरणात झालेल्या या रूहानी कार्यक्रमाला भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खानकाह-ए-चिश्तिया निजामिया, मुख्य कार्यालय छत्रपती संभाजीनगरचे सज्जादानशीन हाजी मोहसिन अली फखरी निजामी यांच्या माध्यमातून विशेषतः आणण्यात आलेल्या मोए पाकच्या दर्शनासाठी मलकापूर शहरासह परिसरातील मोठ्या संख्येने अकीदतमंद उपस्थित होते.

अदब-एहतरामाने घेतले मोए पाकचे दर्शन

मोए मुबारकच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने आणि पूर्ण अदब-एहतराम राखत दर्शन घेतले. यावेळी संपूर्ण खानकाह परिसर दरूद-ओ-सलाम आणि नात-ए-पाकच्या स्वरांनी भक्तिमय झाला होता. श्रद्धेने भारावलेल्या वातावरणात भाविकांनी मोए मुबारकचे दर्शन घेतले.

महिलांसाठी स्वतंत्र दर्शनाची व्यवस्था

कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र पडदा व दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या संख्येने महिलांनीही श्रद्धा आणि आदरपूर्वक मोए पाकचे दर्शन घेतले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खानकाह-ए-निजामिया कमिटीचे पदाधिकारी, सदस्य तसेच खादिमांनी विशेष परिश्रम घेतले. दर्शनाच्या वेळी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजन करण्यात आले होते.

देशाच्या सुख-शांतीसाठी विशेष दुआ

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी देशात शांतता, सलोखा, सुरक्षितता, सुख-समृद्धी आणि प्रगती नांदावी, यासाठी विशेष दुआ करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना मिठाईचा तब्बुरक वाटप करण्यात आला.

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे खानकाह परिसरात दिवसभर श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version