पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पक्षाचे माजी चिटणीस सचिन काळभोर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मुंबईतील मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खाजगी कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्याच्या निमित्ताने ही भेट झाली असली, तरी त्यामागे राजकीय घडामोडी असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे आणि सचिन काळभोर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मतभेद वाढले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच्या निवडणुकीत काळभोर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यास आमदार लांडगे यांनी तीव्र विरोध केल्याचे समोर आले होते. त्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी काळभोर यांनी अर्ज दाखल केला असता, त्या नियुक्तीलाही लांडगे यांनी विरोध केल्याची माहिती आहे.
या पार्श्वभूमीवर काळभोर यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेतल्याने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. भाजपमधील नाराजीमुळे काळभोर यांचा पक्षांतराचा मार्ग खुला होऊ शकतो, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या भेटीमुळे पिंपरी-चिंचवड शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात काही मोठे राजकीय बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काळभोर हे ठाकरे गटात प्रवेश करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
