मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतींना अभिवादन; रजनीताई देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात
जिद्द, चिकाटी आणि सातत्याने क्रीडा क्षेत्रात यश मिळवा; विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ
तालुक्यातील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. डी. भैसे होते, तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या प्रांगणात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. दिनेश तांदळे यांनी प्रास्ताविकातून मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा कारकिर्दीचा आढावा घेतला. मेजर ध्यानचंद हे आजच्या खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत असून, प्रखर राष्ट्रप्रेम, स्वाभिमान, निष्ठा आणि प्रामाणिकपणा या गुणांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व उजळून निघाले होते, असे त्यांनी सांगितले.
भारताने ऑलिंपिकमध्ये हॉकीच्या माध्यमातून आठ सुवर्णपदके मिळविली असून, त्यापैकी तीन सुवर्णपदकांच्या विजयात मेजर ध्यानचंद यांच्या उत्कृष्ट खेळाचा महत्त्वपूर्ण वाटा होता. त्यांच्या क्रीडा कौशल्यातून आजच्या पिढीतील खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन डॉ. तांदळे यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. एस. डी. भैसे यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि सातत्य ठेवून प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. सी. एस. पाटील, डॉ. अतुल देशमुख, डॉ. गजानन चौधरी, इंदिरा लोखंडे, डॉ. जनार्दन देवरे, डॉ. अधिकराव पाटील, प्रा. प्रवीण देसले, प्रा. ज्योती नन्नवरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी-खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रीडा समिती सदस्य प्रा. एस. सी. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
