Spread the love

जिंकणे महत्त्वाचे; पण खिलाडूवृत्ती जपणे त्याहून महत्त्वाचे : पालकमंत्री गुलाबराव पाटील

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा गौरव, जळगावचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे आवाहन

जळगाव, दि. २९ (जिमाका) :
खेळ आपल्याला केवळ विजय मिळविण्याची प्रेरणा देत नाही, तर शिस्त, मेहनत, संयम, संघभावना आणि पराभवानंतर पुन्हा उभे राहण्याची ताकद देतो. जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता आणि जिद्द असून, त्यांना आवश्यक सुविधा व संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. खेळाडूंनी जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्र, देशाचे प्रतिनिधित्व करावे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जळगावचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील सभागृहात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आमदार सुरेश भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, नगरसेवक नीलेश तायडे, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांच्यासह श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू, राज्य व राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

क्रीडा सुविधांसाठी २५० कोटींच्या विभागीय क्रीडा संकुलाचे काम

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगावच्या खेळाडूंना आधुनिक आणि दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्ह्यात सुमारे २५० कोटी रुपयांच्या विभागीय क्रीडा संकुलाचे काम सुरू आहे. तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातही खेळाडूंसाठी विविध सुविधा मंजूर करण्यात आल्या आहेत.

या सुविधांचा पुरेपूर उपयोग करून खेळाडूंनी कठोर मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवावे. मैदानावर विजय मिळविताना प्रतिस्पर्ध्याचा सन्मान करावा आणि खिलाडूवृत्ती कायम जपावी, असे त्यांनी सांगितले.

‘खेळ आनंदासाठी खेळा, विजयासाठी मेहनत करा आणि देशाचा अभिमान वाढवण्यासाठी जिंका,’ असे प्रेरणादायी आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले.

राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा गौरव

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

खेळासोबत पर्यावरण संवर्धनाचाही संदेश

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला एक झाडाचे रोप देऊन त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. दोन वर्षांनंतर हे रोपटे सुदृढ आणि सुंदर पद्धतीने वाढविणाऱ्या व्यक्तीस पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी दिली.

सूत्रसंचालन सुरेश धरपुडे व सचिन निकम यांनी केले, तर जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पालक, क्रीडाप्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version