बोरी धरण तुडुंब भरले; पारोळा तालुक्यात आनंदाची लाट
आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या हस्ते जलपूजन; १४ गावांच्या पाणीपुरवठ्याला दिलासा, १२ गावांतील शेतीला सिंचनाचा आधार
पारोळा | प्रतिनिधी – सुरेश पाटोळे :
पारोळा शहरासह तालुक्यातील १४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख आधार आणि १२ गावांतील शेतीसाठी महत्त्वाचा सिंचन स्रोत असलेला तामसवाडी येथील बोरी मध्यम प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरला आहे. धरणात तब्बल ४०.३१ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) जलसाठा उपलब्ध झाल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर धरणस्थळी आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले.
जलपूजनानंतर आमदार अमोल पाटील यांनी धरणातील पाणीसाठ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी, ग्रामस्थ तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून पाणीपुरवठा व्यवस्था, उपलब्ध जलसाठा आणि सिंचन नियोजनाबाबत माहिती घेतली.
१४ गावांच्या पिण्याच्या पाण्याला मोठा आधार
बोरी प्रकल्प हा पारोळा तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा जलस्रोत आहे. पारोळा शहरासह १४ गावांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यात या धरणाची महत्त्वाची भूमिका आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
१२ गावांतील शेतीला नवसंजीवनी
बोरी धरणातील पाण्याचा फायदा १२ गावांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होणार आहे. जलसाठा मुबलक असल्याने आगामी रब्बी हंगामातील पिकांच्या नियोजनाला चालना मिळणार असून, उत्पादनवाढीसह ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही त्याचा सकारात्मक फायदा होण्याची अपेक्षा आहे.
पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
यावेळी आमदार अमोल पाटील यांनी उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य, काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर करण्याचे आवाहन केले. धरणातील पाण्याचा जास्तीत जास्त लाभ नागरिक आणि शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
बोरी धरण तुडुंब भरल्याने पारोळा शहराच्या पाणीपुरवठ्यासह तालुक्यातील सिंचन व्यवस्थेला मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे यंदाचा मुबलक जलसाठा हा पारोळा तालुक्याच्या विकासासाठी आशादायी ठरला आहे.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी जि.प. माजी कृषी सभापती डॉ. दिनकर पाटील, सहाय्यक अभियंता श्रेणी-१ सिद्धार्थ पाटील, शाखा अधिकारी प्रितम काकडे, पंचायत समितीचे माजी सभापती वसंत पाटील, मुंदाने येथील एकनाथ पाटील, कैलास पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी-कर्मचारी, आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शेतकरी, तामसवाडीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
