राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त धुळ्यात ८८ राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
२६ खेळाडूंना शासनाच्या शिष्यवृत्तीचे वाटप; महापौर चषकाच्या आयोजनाची मागणी
धुळे | प्रतिनिधी :
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे यांच्या वतीने सन २०२५-२६ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या तसेच प्राविण्य प्राप्त केलेल्या ८८ खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी किंवा प्राविण्य मिळविलेल्या २६ खेळाडूंना शासनामार्फत प्राप्त शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
२९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जे. आर. सिटी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, धुळे येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री विसपुते आणि जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हॉकीचे महान खेळाडू स्व. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. आनंद पवार यांनी अशा गौरव सोहळ्यांमुळे खेळाडूंना प्रेरणा मिळते, असे सांगितले. धुळे जिल्हा क्रीडा महासंघाचे सचिव पंढरीनाथ बडगुजर यांनी धुळ्याची क्रीडा क्षेत्रातील ओळख व गौरवशाली इतिहास सांगत खेळाडूंना मार्गदर्शन केले. अध्यक्ष डॉ. महेश घुगरी यांनी जिल्ह्यातील खेळाडूंच्या कामगिरीचा चढता आलेख समाधानकारक असल्याचे नमूद केले.
मुलींच्या क्रीडा सहभागाचे महापौरांकडून कौतुक
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व अध्यक्षस्थानी धुळे शहराच्या महापौर मायादेवी परदेशी होत्या. त्यांनी जिल्ह्यातील खेळाडूंच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करताना विशेषतः मुलींचा क्रीडा क्षेत्रातील वाढता सहभाग आणि उल्लेखनीय कामगिरी कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित क्रीडाप्रेमी, क्रीडा शिक्षक व विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘महापौर चषक’ क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे महापौर मायादेवी परदेशी यांनी सांगितले.
२६ खेळाडूंना शिष्यवृत्ती
सन २०२५-२६ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या किंवा प्राविण्य मिळविलेल्या २६ खेळाडूंना क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत प्राप्त शासनाच्या शिष्यवृत्तीचे सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, महादेव परदेशी, माजी नगरसेवक प्रफुल्ल पाटील, संजय बोरसे, हेमंत मराठे, जे. आर. सिटी हायस्कूलच्या प्राचार्या शिल्पा कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील, क्रीडा अधिकारी रेखा पाटील व स्वप्निल बोढे, बास्केटबॉल क्रीडा मार्गदर्शक मुद्रा अग्रवाल, जिम्नॅस्टिक व योगा क्रीडा मार्गदर्शक योगेश्वरी मिस्तरी, स्काउट-गाईडचे राज्य संघटन आयुक्त श्रीधर कोठावदे, विद्या भदाणे, योगेश पाटील यांच्यासह क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी स्वप्निल बोढे यांनी, तर आभार प्रदर्शन बास्केटबॉल क्रीडा मार्गदर्शक मुद्रा अग्रवाल यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन कर्मचारी, जे. आर. सिटी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा संचालक भूपेंद्र मालपुरे, मनोज चौधरी, जिल्हा क्रीडा संकुलातील योगेश देवरे, योगेश पाटील, ज्ञानेश्वर जाधव, राहुल देवरे, दिनेश शिरसाठ तसेच जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले.
