धरणगावच्या विविध समस्यांवर महायुती पदाधिकाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा
डासांचा प्रादुर्भाव, डेंग्यूचा धोका आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर; तातडीच्या उपाययोजनांची मागणी
धरणगाव :
धरणगाव शहरातील विविध प्रलंबित समस्या आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत शिवसेना-भाजप महायुतीच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी नवनिर्वाचित मुख्याधिकारी रोशन राजपूत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. मुख्याधिकारी कार्यालयात झालेल्या या भेटीत शहरातील आरोग्य, स्वच्छता तसेच अतिक्रमणाच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
डासांचा वाढता प्रादुर्भाव; फवारणीची मागणी
धरणगाव शहरात सध्या मच्छर तसेच विषारी कीटकांचे प्रमाण वाढले असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. डासांचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरात डेंग्यू व इतर आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली असून, तातडीने औषध फवारणी आणि स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली.
कोरोना काळात शहरात वेळोवेळी धूर फवारणी करण्यात येत होती. त्यासाठी वापरण्यात येणारे मशीन सध्या कुठे आहे, याचीही चौकशी करून उपलब्ध साधनसामग्रीच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात धूर फवारणी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.
आधुनिक फवारणी मशीन उपलब्ध होईपर्यंत नगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून फवारणी, स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, जेणेकरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
शिवाजी महाराज स्मारक परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न
धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात लोडगाडीधारकांकडून नियमितपणे अतिक्रमण केले जात असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. सायंकाळी सहा वाजेपासून रात्री नऊ-दहा वाजेपर्यंत या परिसरात मोठ्या प्रमाणात लोडगाड्यांचा गराडा असतो. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण होत असून, चारचाकी वाहनांना मार्ग काढणेही अवघड होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र अतिक्रमण पथकाची स्थापना करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात या परिसरात पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी नियमित कारवाई व देखरेख ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.
नागरिकांच्या समस्यांवर तातडीने कार्यवाहीची अपेक्षा
शहरातील स्वच्छता, आरोग्य, अतिक्रमण आणि इतर विविध नागरी समस्यांबाबत मुख्याधिकारी रोशन राजपूत यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी जळगाव जिल्हा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव चौधरी, शिवसेना शहरप्रमुख धीरेंद्र पुर्भे, भाजप-शिवसेना महायुतीचे नगरसेवक कडू बयस, हाजी इब्राहिम, तोसीब पटेल, चेतन जाधव, शिवसेना शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, व्यापारी सेनेचे तालुकाप्रमुख निलेश भाऊ वाणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
