शेतातील १५ क्विंटल केळी चोरणारा मुख्य आरोपी जेरबंद
फैजपूर पोलिसांची कारवाई; विकलेल्या केळीतील १५ हजारांची रक्कम जप्त, सीसीटीव्ही व बँक व्यवहारातून लागला आरोपीचा माग
फैजपूर प्रतिनिधी अक्षय वाघ | दि. ३१ ऑगस्ट २०२६ : फैजपूर परिसरातील आमोदा शिवारातील शेतातून तब्बल १५ क्विंटल केळीचे घड चोरून नेणाऱ्या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपीला फैजपूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. लहू अशोक केदारे (रा. लुंबिनीनगर, बामणोद, ता. यावल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीच्या केळी विक्रीतून मिळालेल्या त्याच्या हिस्स्याची १५ हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शेतकऱ्याच्या ३० हजारांच्या केळीवर डल्ला
त्रिमूर्ती चौक, फैजपूर येथील शेतकरी जितेंद्र दिनकर कोल्हे (वय ४५) यांनी आमोदा गावाच्या शिवारातील गट क्रमांक २०५ मध्ये केळीची लागवड केली होती. त्यांच्या शेतातील सुमारे ७० ते ८० केळीचे घड, एकूण १५ क्विंटल केळी, अंदाजे ३० हजार रुपये किमतीची, अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती.
याप्रकरणी ४ जुलै २०२६ रोजी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही आणि बँक व्यवहारातून आरोपींचा शोध
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच बँक व्यवहारांची माहिती तपासली. त्यातून लहू अशोक केदारे, अजय सुनील केदारे, शुभम विजय केदारे आणि सुरज मिलिंद मोरे (सर्व रा. लुंबिनीनगर, बामणोद, ता. यावल) यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील मुख्य सूत्रधार लहू केदारे हा गुन्हा केल्यानंतर फरार झाला होता.
फैजपूर शहरात सापळा रचून अटक
फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. आरोपी लहू केदारे हा २७ ऑगस्ट रोजी फैजपूर शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केली.
आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.
चोरीची केळी विकल्याची कबुली
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेली केळी विकल्याचे सांगितले. त्या विक्रीतून त्याच्या हिस्स्याला आलेली १५ हजार रुपयांची रक्कम पोलिसांनी हस्तगत केली असून, या कारवाईमुळे केळी चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक सुदीप गाबीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक संतोष चौधरी, सहायक फौजदार मोती पवार, पोहेकॉ. विकास सोनवणे आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल महाजन यांच्या पथकाने केली.
