ई-पिक पाहणीची नोंदणी शेतकरी स्तरावर करण्याची शेतकरी संघटनेची मागणी
आर्थिक भुर्दंड व गैरप्रकारांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे निवेदन; नायब तहसीलदारांकडे मागणी
भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ
ई-पिक पाहणीची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन नियुक्त सहाय्यकांमार्फत नोंदणी करून घ्यावी लागत असल्याने शेतकऱ्यांना अनावश्यक आर्थिक खर्चाचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी ई-पिक पाहणीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारीही प्राप्त होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.
शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे स्वतःच्या मोबाईलद्वारे ई-पिक पाहणीची नोंदणी करण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार सुधीर सोनवणे यांना देण्यात आले.
शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या शेतातील पिकांची नोंद करू शकत असल्यास त्यांचा अनावश्यक खर्च वाचेल. तसेच संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि शेतकरीहिताची होण्यास मदत होईल, असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन ई-पिक पाहणीची नोंदणी शेतकरी स्तरावर पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अखिलेश पाटील यांनी केली.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष वाल्मीक लोखंडे, धनराज पाटील, कार्याध्यक्ष सतीश पाटील, सचिव डॉ. योगेश गोसावी, युवा अध्यक्ष लिलाधर पाटील, युवा उपाध्यक्ष सागर पाटील, सरचिटणीस समाधान पाटील, सरदारसिंग पाटील, रामकृष्ण माळी, नरेंद्र पाटील, संघटक संजय खैरनार, संजय पाटील, चिटणीस योगेश शालिक पाटील, युवा सचिव योगेश खुशाल पाटील तसेच युवा संघटक विकी पाटील उपस्थित होते.
