Spread the love

विस्तार अधिकाऱ्याकडून ग्रामपंचायत अधिकाऱ्याला शिवीगाळ व मानसिक त्रासाचा आरोप

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनची गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार; चौकशी व प्रशासकीय कारवाईची मागणी

सोयगाव (प्रतिनिधी – शिवराम दगडू जाधव) : सोयगाव पंचायत समितीतील विस्तार अधिकारी (पं.) अशोक दौड यांनी ग्रुप ग्रामपंचायत निंबायती तांडा येथील ग्रामपंचायत अधिकारी योगेश सपकाळ यांना ग्रामसभेला का उपस्थित राहिला नाही, असा जाब विचारत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन, सोयगाव शाखेच्या वतीने करण्यात आला आहे. याप्रकरणी गटविकास अधिकारी वर्ग-१ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

३१ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित बैठकीदरम्यान तसेच ग्रामसभेच्या अनुषंगाने हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित घटनेचे ऑडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचा दावाही युनियनच्या वतीने करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, संबंधित अधिकाऱ्याच्या कथित वर्तनामुळे शासकीय कार्यालयातील कामकाजाच्या वातावरणावर विपरीत परिणाम होत असून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन विस्तार अधिकारी अशोक दौड यांची तात्काळ चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.

या निवेदनावर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे तालुकाध्यक्ष विकास क्षीरसागर, सरचिटणीस सुनील मंगरूळे, जिल्हा संघटक श्रीकांत पाटील यांच्यासह सोयगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ग्रामपंचायत अधिकाऱ्याची स्वतंत्र तक्रार

दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी योगेश सपकाळ यांनीही स्वतंत्र निवेदन देऊन विस्तार अधिकारी अशोक दौड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे.

तालुक्यात नियोजित वेळेत ग्रामसभा घेण्यात आल्या असतानाही आपल्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला आहे. अशा प्रकारचे वर्तन हे अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणारे असून, यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील शासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी प्रशासनाकडून चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत अधिकारी युनियनकडून करण्यात आली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version