पाच दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह मक्याच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळला
बहुळखेडा येथील घटना; वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी लावलेले विद्युत तारांचे सापळे पोलिसांनी केले जप्त
सोयगाव, दि. ३ सप्टेंबर २०२६ (प्रतिनिधी : शिवराम जाधव) : सोयगाव तालुक्यातील बहुळखेडा येथील रहिवासी दगडू बिरहान तडवी (वय ५०) हे गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी सुमारे ७ वाजता बहुळखेडा परिसरातील मक्याच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
शेत परिसरातून दुर्गंधी येत असल्याने काही स्थानिक नागरिकांनी तेथे जाऊन पाहणी केली असता मृतदेह आढळून आला. यानंतर तात्काळ सोयगाव पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
घटनास्थळावरून विद्युत तारांचे सापळे जप्त
घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी वन्यप्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या बांधावर लावण्यात आलेले विद्युत तारांचे धोकादायक सापळे पोलिसांनी जप्त केले.
या विद्युत सापळ्याच्या संपर्कात आल्याने दगडू तडवी यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान, शेतीच्या संरक्षणासाठी बेकायदेशीरपणे विद्युत तार लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेचा पुढील तपास सोयगाव पोलिस ठाणे करीत आहे.
