Spread the love

बोदवड शहरासह तालुक्यात चोऱ्यांचे सत्र; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बंद दुकाने व कार्यालये चोरट्यांच्या निशाण्यावर; पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह

बोदवड : प्रतिनिधी : बोदवड शहरासह तालुका परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बंद दुकाने व कार्यालयांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात असल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

१ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री बसस्थानक परिसरातील पत्रकार सुरेश कोळी यांच्या कार्यालयात भिंत तोडून चोरट्यांनी प्रवेश केल्याची घटना घडली. यावेळी कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे तसेच सुमारे २० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.

याच परिसरातील अमोल घुले यांच्या रॉयल चॉईस मेन्स वेअर या दुकानाच्या मागील बाजूच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, ३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजता रेणुका मंदिराजवळील राजेंद्र अग्रवाल यांच्या सहेली जनरल स्टोअर्समध्ये चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेत सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती आहे.

शहरात अल्पावधीत चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. व्यापारी व नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, चोरीच्या घटनांचा तातडीने तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी

चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने शहरातील प्रमुख भागांमध्ये रात्रीची गस्त वाढवावी. तसेच बसस्थानक परिसर, बाजारपेठ आणि संवेदनशील ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा नागरिक व व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version