शहाद्यात महिलांसाठी अमृत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाला सुरुवात
स्वयंरोजगाराच्या दिशेने महिलांना मोठी संधी; तालुक्यातील १५ महिला प्रशिक्षणाचा घेणार लाभ
शहादा : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहर व तालुक्यातील महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारून स्वावलंबी होण्यासाठी अमृत संस्थेच्या माध्यमातून ब्युटी पार्लर प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली. या प्रशिक्षणाचा शुभारंभ विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी मंगेश खाडिलकर यांनी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती उपस्थित प्रशिक्षणार्थींना दिली. तसेच ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू करताना आवश्यक असणाऱ्या बाबी, व्यवसाय नियोजन आणि स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाचा लाभ शहादा तालुक्यातील १५ महिला घेणार असून, प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना कौशल्याधारित रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. महिलांनी प्रशिक्षणाचा योग्य उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
कार्यक्रमाला जिल्हा उपव्यवस्थापक कार्तिक तोमर, कविता गिरासे, तसेच राजपूत समाजाच्या प्रमुख दीपाली ताई राजपूत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महिलांना रोजगाराच्या पारंपरिक संधींसोबतच कौशल्याधारित व्यवसायाकडे वळविण्यासाठी अशा प्रशिक्षण उपक्रमांचे महत्त्व वाढले आहे. शहाद्यात सुरू झालेल्या या प्रशिक्षणामुळे सहभागी महिलांना स्वतःचा ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्य मिळण्यास मदत होणार आहे.
